पुण्यात ८ तासात ४ हजार ६०० श्रवणयंत्रे बसविण्याचा जागतिक विक्रम

record
पुणे – ८ तासात तब्बल ४ हजार ६०० श्रवणयंत्रे बसविण्याचा जागतिक विक्रम पुण्यात रचण्यात आला असून हे मोफत श्रवणयंत्र जोडणी शिबीर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि स्टार्की फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आले होते. शुक्रवारी हा विक्रम पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्रीशिवछत्रपती क्रीडासंकुलात रचला गेला.

या शिबिरात राज्यभरातील ६ हजार कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना श्रवणयंत्र बसवण्यात आले. ८ तासांमध्ये ४ हजार ८०० श्रवणयंत्र या शिबिरात बसवून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. या विक्रमाची नोंद ‘गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने घेतली असून या शिबिरात एकूण ६ हजार जोडणी झाली असली, तरी शिबिराच्या काळातील ८ तासांमध्ये ४ हजार ८०० श्रवणयंत्रे जोडण्याचा विक्रम प्रस्थापित झाला आहे. ८ तासांच्या कालावधीतच याआधी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम आणि मणिपूर सरकारच्यावतीने घेण्यात आलेल्या ३ हजार ९११ श्रवणयंत्र जोडणींचा विक्रम रचण्यात आला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, अजित पवार, खासदर सुप्रिया सुळे, स्टार्की हिअरिंग फाउंडेशनचे अध्यक्ष विल्यम ऑस्टिन यावेळी उपस्थित होते. या उपक्रमाची आखणी खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने करण्यात आली होती. हा विक्रम प्रत्यक्षात प्रस्थापित करण्यापुर्वी राज्यभरातील १८ जिल्ह्यात २५ ठिकाणी पूर्वतपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरातून श्रवणयंत्र बसविल्यानंतर श्रवणक्षम होऊ शकणारे कर्णबधीर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची निवड करण्यात आली. त्यांना शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमात श्रवणयंत्रे बसविण्यात आली. याशिवाय पूर्वतपासणी न झालेल्या व्यक्तींनाही योग्य तपासण्या करुन या उपक्रमात सामावून घेण्यात आले. या उपक्रमात एकूण १०३ भारतीय ऑडीओलॉजिस्ट , ४ नाक, कान, घसा तज्ज्ञ आणि १ हजार १०० सव्यंसेवक सहभागी झाले होते. मोफत जोडलेल्या एका श्रवणयंत्राची प्रत्यक्ष किंमत ४५ हजार रुपये असून या उपक्रमात १८ जिल्ह्यातील ६ हजार लोकांना श्रवणयंत्र वाटप करण्यात आले.

Leave a Comment