चंद्राबाबूविरुद्ध अटक वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशांना धमकी

chandrababu-naidu
नांदेड – अज्ञात व्यक्तीने धर्माबादचे प्रथमवर्ग न्यायाधीश एन. आर. गजभिये यांना धमकी दिल्याची खळबळजनक घटना समोर आली असून बाभळी बंधारा परिसरात चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्याविरूद्ध गजभिये यांनी अटक वॉरंट जारी केले होते. न्यायाधीशांवर याच प्रकरणात दबाव टाकण्यासाठी ही धमकी देण्यात आली आहे.

पैसे हवे असतील तर आम्हाला सांगा आम्ही पैसे देऊ, पण जर आमचे ऐकले नाहीत तर ठार मारू, असे धमकी देणाऱ्या पत्रात लिहिले आहे. आमचे तगडे राजकीय संबंध असल्यामुळे आमच्याशी पंगा घेऊ नका, असेही या पत्राद्वारे न्यायाधीशांना धमकावण्यात आले आहे. न्यायालयात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हजर न राहिल्यामुळे त्यांच्याविरुध्द वॉरंट जारी करण्यात आले होते. याचाच राग आल्याने ही धमकी देण्यात आली आहे. धमकीचे पत्र मिळाल्यानंतर हे पत्र पाठवणाऱ्याचा पोलिसांनी शोध सुरू केला असून न्यायाधीश गजभिये यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

बाभळी बंधाऱ्याचे आंदोलन पेटले असताना आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करीत आंदोलन केले होते. नायडूंसह एकूण १७ जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला होता. नायडू यांचा हा बंधारा बांधण्यास विरोध होता. बंधारा बांधल्यास तो बॉम्बने उडवून देण्याची धमकी त्यांनी दिली होती. या प्रकरणी न्यायाधीशांनी नायडूंना ३२ वेळा हजर राहण्यास सांगूनही नायडू न्यायालयात हजर राहिले नव्हते. अखेर गजभिये यांनी त्यांच्याविरूद्ध अटक वॉरंट जारी केले होते.

Leave a Comment