‘त्या’प्रकरणामुळे फेसबुकला ठोठावण्यात आला ४ कोटींचा दंड

facebook
लंडन – फेसबुकला ५ लाख पाऊंडचा (सुमारे ४.७ कोटी रुपये) दंड ब्रिटनच्या माहिती आयुक्तांनी ठोठावला असून फेसबुकला ब्रिटिश कंपनी कॅम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरणाचा चांगलाच दणका बसला आहे. हा दंड या सोशल नेटवर्किंग साईटच्या भूमिकेवरुन ठोठावण्यात आला आहे. अवैधरित्या एका अॅपच्या सहाय्याने कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने कोट्यवधी फेसबुक यूजर्सचा डेटा मिळवला होता.

सन २०१६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यानही या डेटाचा वापर कथितरित्या करण्यात आला होता. ब्रिटनचे सूचना आयुक्त कार्यालयाच्या (आयसीओ) चौकशीत असे आढळले होते, की फेसबुकने सन २००७ ते २०१४ च्या दरम्यान अॅप डेव्हलपर्सला यूझर्सच्या संमतीविना त्यांची वैयक्तिक माहिती उपलब्ध करुन दिल्यामुळे बेकायदेशीररित्या वैयक्तिक माहिती पुरवल्याबद्दल आणि कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल फेसबुकला हा दंड ठोठावण्यात आला आहे.

हे प्रकरण जर युरोपीय संघाचा (ईयू) डेटा संरक्षण कायदा अंमलात आल्यानंतर घडले असते तर दंडाची रक्कम अत्याधिक पटीने वाढली असती. ईयूने डेटा लिक प्रकरणानंतर आणखी कडक कायदे अंमलात आणण्यास सुरुवात केली आहे. डेटा लीक झाल्याचे प्रकरण यावर्षी मार्चमध्ये समोर आल्यानंतर फेसबुकवर जागतिक स्तरावरुन टीका करण्यात आली होती. फेसबुकवर आरोप करण्यात आला होता, की फेसबुकच्या कोट्यवधी यूझर्सच्या डेटाचा राजकीय सल्लागार कंपनी कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने दुरूपयोग केला.

८ कोटीपेक्षा जास्त फेसबुक यूझर्सचा डेटा कॅम्ब्रिज अॅनालिटिकाने एका अॅपच्या सहाय्याने मिळवला होता. हे अॅप जवळपास २.७० लाख लोकांनी डाउनलोड केले होते. सुरुवातीला ५ कोटी यूझर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, नंतर ८ कोटीपेक्षा जास्त यूझर्सचा डेटा लीक झाल्याचे फेसबुकने मान्य केले होते.

Leave a Comment