पुढील महिन्यात सलग ११ दिवस बंद राहणार बँका ?

bank
दिवाळीसह अनेक सण येत्या महिन्यात येत असल्यामुळे सरकारी कार्यालयांना या सणांदरम्यान सुट्ट्या असणार आहेत. दिवाळी सण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येत असल्यामुळे अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत. येत्या ५ ते ११ नोव्हेंबरपर्यंत अनेक राज्यात सुट्ट्या असणार आहेत. त्यामुळे बँकांशी संबंधित कामांवर याचा परिणाम होणार आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात दिवाळीला सुरुवात होणार आहे. धनत्रयोदशी (५ नोव्हेंबर), नरकचतुर्दर्शी (६ नोव्हेंबर), लक्ष्मीपूजन (७ नोव्हेंबर), पाडवा (८ नोव्हेंबर) आणि भाऊबीज (९ नोव्हेंबर) असा हा क्रम राहणार असून त्यानंतर १० आणि ११ तारखेला शनिवार आणि रविवार आहे. या दरम्यान निम्म्याहून अधिक बँका बंद राहणार असल्यामुळे एटीएममध्ये कॅशचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऐनवेळी समस्येला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी ग्राहकांना घेणे गरजेचे आहे.

ग्राहकांना गरजेनुसार एटीएममधून अगोदर कॅश काढून ठेवण्याचा पर्याय उपयुक्त आणि हिताचे ठरणार आहे. यामुळे वेळेवर होणारी धावपळ त्यांना टाळता येणार आहे. सोमवारी (१२ नोव्हेंबर) बँक उघडणार आहेत. मात्र १३ आणि १४ नोव्हेंबरला काही राज्यामध्ये पुन्हा बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. बिहार, पूर्व उत्तर प्रदेश आणि झारखंड येथे छठ पूजा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त देशातील अन्य राज्यांमध्ये छठ पूजा हा सण साजरा करण्यात येतो. त्यामुळे बँकांचे दैनंदिन व्यवहार यामुळे ठप्प होणार आहेत.

छठ पूजेनंतर २१ नोव्हेंबरला ईद-ए-मिलाद आणि २४ नोव्हेंबरला गुरू तेग बहादुर शहीद दिवस आहे. त्यानंतर २३ नोव्हेंबरला गुरू नानक जयंती येत आहे. यादरम्यान अधिकाधिक राज्यात सरकारी सुट्ट्या असतात. ज्यामुळे बँकाही बंद राहणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये शनिवार-रविवार हे दिवस सोडूनही अनेक सुट्ट्या येत असल्यामुळे ग्राहकांनी बँकांशी आणि एटीएमशी संबंधित कामे वेळेपूर्वीच आटोपून घ्यावी. बँकांनी मात्र यावर बोलताना माहिती दिली आहे, की सणांच्या वेळी एटीएममध्ये कॅशची कमतरता भासणार नाही याचे नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Comment