भारतभारत कार्तिकी चतुर्थीला मोठ्या मनोभावे सुहासिनी ज्या करवा चौथ व्रताचे पालन करतात त्या चौथमातेचे देशातील सर्वात मोठे मंदिर राजस्थान मधील सवाई माधोपुर जिल्यात चौथ का बरवाडा येथे आहे. या मंदिराची स्थापना १४५१ साली तेथील तत्कालीन शासक भीमसिंग याने केली असून हे मंदिर १ हजार फुट उंच टेकडीवर बांधले गेले आहे. या मंदिरात जाण्यासाठी ७०० पायऱ्या चढून जावे लागते. कार्तिक चतुर्थी निमित्त येथे मोठ्या संख्येने भाविक येतात.
देशातील सर्वात मोठे चौथमाता मंदिर
चौथमाता हे दुर्गेचेच एक रूप मानले जाते. ५६५ वर्षे जुन्या या मंदिरात सुहासिनी पतीला दीर्घायुष्य आणि अखंड सौभाग्य मागण्यासाठी येतात. या देवीच्या दर्शनाने दाम्पत्य जीवन सुखी बनते असाही विश्वास आहे. हिरवळीने आणि गवताच्या कुरणांनी नटलेल्या या टेकडीवर एक तलाव बांधला गेला आहे. पांढऱ्याशुभ्र संगमरवरात प्रशस्त मंदिर बांधले गेले असून गाभाऱ्यात चौथमाता, गणेश आणि भैरव यांच्या मूर्ती आहेत. मंदिराचे बांधकाम राजपुताना शैलीतील आहे.
या भागात घरात कोणतेही शुभकार्य असेल तर प्रथम या देवीला आमंत्रण करण्याची पद्धत असून हि बुंदेल राजघराण्याची कुलदेवता आहे असेही सांगितले जाते.