कोल्हापूर – पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली असून फडणवीस बुधवारी कोल्हापूर आणि सांगलीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. मुख्यमंत्र्याचे हेलिकॉप्टर सांगलीतील कार्यक्रम करुन कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा कोडीलीमध्ये ऊस परिषदेला जाताना तब्बल अर्धा तास भरकटल्यामुळे त्यांना कार्यक्रमात पोहोचण्यासाठी उशिर झाला.
पुन्हा एकदा भरकटले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर
दरम्यान, मुख्यमंत्री सकाळी मुंबईतून विमानाने बेळगावमध्ये दाखल झाले. हेलिकॉप्टरने तिथून सांगलीत आले. सांगलीतील कार्यक्रम करून वारणा कोडोलीत रयत क्रांती संघटनेच्या ऊस परिषदेला जात असताना हेलिकॉप्टर भरकटले. हेलिकॉप्टर सांगलीमधून निघाल्यानंतर ते चुकून जोतिबा डोंगर आणि सादळे मादळे परिसरात गेले. पण नंतर ही चूक चालकाला लक्षात येताच पुन्हा महामार्ग आणि किणी वाठारमार्गे हे हेलिकॉप्टर वारणा कोडोलीमध्ये दाखल झाले. यापूर्वी अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना हेलिकॉप्टरच्या त्रुटींचा सामना करावा लागला असल्यामुळे कोल्हापूरमध्येही मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर भरकटल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.