टेलिकॉम सेक्टरमधील ६० हजार लोकांच्या रोजगारावर टांगती तलवार

telecom
नवी दिल्ली – सध्या टेलिकॉम सेक्टरमधील ६० हजार लोकांच्या नोकरीवर टांगती तलवार असून याबाबत एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार टेलिकॉम क्षेत्रातील ६० हजार लोकांना या आर्थिक वर्षाच्या अखेरीस नोकरीवरुन काढण्यात येऊ शकते. विलिनीकरण करणाऱ्या कंपन्यांसोबत पायाभूत सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या, टावर फर्म्स आणि उद्योगाशी संबंधित रिटेल आर्म्स अधिक मनुष्यबळ ठेवण्यास कचरत असल्यामुळे अनेकांवर नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते.

दूरसंचार क्षेत्रातील ६० हजार लोकांना जर नोकरीवरुन काढण्यात आले तर याचा सर्वात जास्त प्रभाव कस्टमर सपोर्ट आणि फायनॅन्शियल व्हर्टिकल्सवर पडणार. या दोन्ही क्षेत्रांना सर्वात जास्त धोका आहे. याबाबत मीडियाने दिलेल्या माहितीनुसार या दोन क्षेत्रातील जवळपास ८ आणि ७ हजार लोकांवर नोकरी गमवण्याची वेळ येऊ शकते.

अहवालात दिलेल्या माहितीनुसार दूरसंचार क्षेत्रातील १५-२० हजार नोकऱ्या आर्थिक वर्ष २०१८ च्या सुरुवातीला दोन तिमाहित कमी झाल्या. दूरसंचार क्षेत्रातील तज्ज्ञांचे यावर म्हणणे आहे, की जरी २०१८-१९ वर्षाच्या दोन तिमाही अपेक्षेनुसार राहिल्या नाही. मात्र आता काळ बदलणार आहे. कंपन्या आता कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा, 4G नेटवर्क मध्ये नियुक्तीवर अधिक भर देत आहेत. काही तज्ज्ञांचे यावर म्हणणे आहे, की येणाऱ्या दोन तिमाहित ५ हजार पेक्षा जास्त लोकांना नोकरीवरुन काढण्यात येऊ शकते. उल्लेखनीय म्हणजे टेलिकॉम सेक्टरमध्ये मागील काही वर्षात प्राईस वॉर, लहान कंपन्यांचे उद्योग बंद होणे, कंपनीचे विलिनीकरण यामुळे नफ्यात घट झाली आहे.

Leave a Comment