सीबीआयच्या प्रभारी संचालक पदी एम. नागेश्वर राव यांची नियुक्ती

M-Nageshwar-Rao
नवी दिल्ली – केंद्र सरकारने सीबीआयमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एम. नागेश्वर राव यांची केंद्रीय गुन्हेअन्वेषण विभागाच्या (सीबीआय) प्रभारी संचालकपदावर नियुक्ती केली आहे. सीबीआयचे संचालक आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर राव यांची तत्काळ नियुक्ती करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयच्या विशेष पथकाने आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांच्या कार्यालयावर छापे टाकले होते. त्यानंतर त्याचे कार्यालय असलेला दहावा आणि अकरावा मजला सील करण्यात आला. दरम्यान, हा वाद मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचला होता. सीबीआयचे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्याविरोधात लाचखोरीप्रकरणी सुरू असलेल्या फौजदारी कारवाईला दिल्ली उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र असे असले तरी, त्यांच्या चौकशीला आपली कसल्याही प्रकारची हरकत नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

अस्थाना यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीबीआयवर थेट नियुक्ती केली होती. तेव्हा या नियुक्तीला संचालक आलोक कुमार वर्मा आणि सहसंचालक ए. के. शर्मा यांनी प्रचंड विरोध केला होता. अस्थाना हे गुजरात कॅडरचे पोलीस अधिकारी आहेत. अस्थाना आणि उप अधीक्षक देवेंदर कुमार यांनी मांस निर्यातदार मोईन कुरेशी यांची चौकशी थांबविण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

Leave a Comment