ट्रम्पमुळे चीनच्या सर्वात श्रीमंत महिलेचे ५००० कोटी रुपयांचे नुकसान

china
अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापार युद्धाला सुरूवात झाली असून या युद्धाचा पहिला फटका चीनमधील सर्वात श्रीमंत महिलेला बसला आहे. या व्यापार युद्धामुळे झू कुनफेई नावाच्या महिलेची संपत्ती साडे सहा अब्ज डॉलर म्हणजेच सुमारे ५००० कोटी रुपयांनी कमी झाली आहे.

झू कुनफेई यांची लेन्स टेक्नॉलॉजी ही कंपनी अॅप्पल आणि टेस्ला यांच्यासाठी टचस्‍क्रीन तयार करत असे. त्यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये यावर्षी ६२ टक्के घट झाली आहे, त्यामुळे आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत ६६ टक्क्यांची घट झाली आहे.

अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे अनेक चिनी अब्जोपतींना नुकसान झाले आहे. अलीबाबा ग्रुपचा संस्‍थापक जैक मा आणि टेनसेंट होल्डिंग्‍सचा मुख्य कार्यकारी अधिकारी मा हुतेंग यांचीही त्यातून सुटका झाली नाही.

ऑक्‍सफॉर्ड इकॉनॉमिक्‍सच्या अहवालानुसार, अमेरिकी व्‍यापार धोरणातील बदलांचा सर्वात जास्त प्रतिकूल परिणाम चीनवरच झाला आहे. चीनच्या अनेक कंपन्या अमेरिकी तंत्रज्ञान कंपन्यांना कच्‍चा माल आणि सुटे भाग पुरवतात. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांनी चिनी मालावर २६७ अब्ज डॉलरचे अतिरिक्त शुल्क लावण्याची घोषणा गेल्या महिन्यात केली होती. झू यांचा जन्‍म १९७० मध्ये हुनान प्रांतातील शियांगशियांग येथे झाला होता. स्वतःची कंपनी सुरू करण्यापूर्वी त्यांनी सहा वर्षांपर्यंत काचेच्या कारखान्यात काम केले होते, असे सिडनी मॉर्निंग हेरॉल्डने म्हटले होते.

Leave a Comment