महिला कर्मचाऱ्यानेच केले पेटीएमच्या मालकाला ब्लॅकमेल, मागितली २० कोटींची खंडणी

paytm
नवी दिल्ली – पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा आणि त्यांचा भाऊ अजय शेखर यांना ब्लॅकमेल केल्याचे प्रकरण समोर आले असून त्यांनी आरोप केला आहे की, डेटा चोरी करून तो सार्वजनिक करण्याची धमकी सेक्रेटरी सोनिया धवननेच दिली होती. तिने याबदल्यात २० कोटी रुपयांची मागणी केली होती. सोनियासहित ३ आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. एक आरोपी फरार असल्याचे सांगितले जात आहे. अजय शेखर यांच्या मते, पहिल्यांदा २० सप्टेंबर रोजी थायलंडच्या व्हर्चुअल नंबरवरून डेटा लीक करण्याची धमकी देणारा फोन आला होता. दुसऱ्या दिवशी त्याच नंबरवरून विजय यांनाही फोन आला.

याबाबत अजय यांनी सांगितले की, इस्रायलच्या आयटी एक्स्पर्टच्या मदतीने या कॉलला ट्रेस करण्यात आले. वास्तविक, पोलिस व्हर्च्युअल नंबरला ट्रेस करू शकत नसल्यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी इस्रायलच्या एक्स्पर्टची मदत घेतली, यानंतर कोलकात्यात राहणाऱ्या आरोपीचे सत्य समोर आले.

नोएडाचे एसएसपी अजय पाल शर्मा यांच्या मते, एक महिला आणि तिच्या सहकाऱ्यांविरुद्ध पेटीएमच्या मालकाने तक्रार दाखल केली होती. कंपनीचा डाटा चोरीला गेल्याची आणि ब्लॅकमेलिंगची तक्रार त्यांनी दिली होती. त्यांच्याकडे आरोपींनी २० कोटी रुपयांची मागणी केली होती. तिघांविरुद्ध आम्ही एफआयआर दाखल केली. याप्रकरणी ताबडतोब अॅक्शन घेत महिलेसहित ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

अजय म्हणाले, १ ऑक्टोबरपासून ब्लॅकमेलिंग सुरू झाली. १० ऑक्टोबर रोजी आम्ही फक्त ६७ रुपये आरोपीच्या अकाउंटमध्ये टाकून त्याचे बँक डिटेल्स मिळवले. मग १५ ऑक्टोबर रोजी 2 लाख रुपये त्यांनी सांगितलेल्या बँक अकाउंटमध्ये जमाही केले. यामुळे आरोपींचा आत्मविश्वास वाढला. मग आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली.

Leave a Comment