केंद्र सरकारची अनिवासी भारतीयांच्या अवैध संपत्तीवर करडी नजर

NRI
नवी दिल्ली – केंद्र सरकारने काळ्या पैशांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अनेक श्रीमंतांनी तर देशातून पलायनही केले आहे. आता आणखी कडक धोरण सरकार अवलंबत असून विदेशात अवैध मार्गाने पैसा आणि संपत्ती जमवणाऱ्यांच्या विरोधात महसूल विभागाने नवी मोहीम सुरू केली आहे. विशेष म्हणजे यात सरकारच्या रडारवर हायप्रोफाईल व्यक्ती आहेत.

याबाबत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अलीकडेच अशा लोकांच्या विरोधात तयार करण्यात आलेल्या कायद्यांचा वापर करण्यात येऊ शकतो. परदेशी तपास संस्थांशी महसूल विभाग संपर्क साधून आहे. परदेशी बँकात हजारो भारतीयांची बँकेतील ठेवी आणि मालमत्तेची तपासणी विभागाकडून करण्यात येत आहे. याला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) अध्यक्ष सुशील चंद्रा यांनीही दुजोरा दिला आहे. मात्र या मोहिमेसंदर्भात त्यांनी आणखी काही बोलण्यास नकार दिला.

यावर अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले, की फायनॅन्शिअल इंटेलिजेंस युनिट (एफआययू) आणि अन्य सूत्रांकडून मिळालेल्या व्यवहारांविषयी विभागाकडे माहिती आहे. ही मोहीम काळ्या पैशांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. अनेक प्रकरणात काही जणांना आणि कर भरणाऱ्यांना नोटीस पाठवण्यात आली असून त्यांनी केलेल्या व्यवहारासंबंधी माहिती मागण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले, की हाय प्रोफाईल व्यक्तींनी केलेले व्यवहार या तपासाच्या कक्षेत आहे. आयकर परतावा ज्यांनी भरलेला नाही, ज्यांनी आयकर परतावा भरला मात्र त्यात कर भरताना हेरफेर केली असेल तर अशांवर काळ्या पैशांच्या विरोधात बनवलेल्या कायद्या अंतर्गत कारवाई करता येणार आहे.

Leave a Comment