कर्मचाऱ्यांनो, डेस्कवरच जेवा -खोट्या बातम्या रोखण्यासाठी फेसबुकची क्लृप्ती

facebook
निवडणुकांमध्ये खोट्या बातम्या रोखण्यासाठी फेसबुकने एक ‘वॉर रूम’ स्थापन केला आहे. तेथील कर्मचाऱ्यांना दिवस-रात्र आपल्या संगणकाच्या पडद्याकडे लक्ष द्यावे लागते. या कर्मचाऱ्यांना फक्त टॉयलेटला जाण्यासाठी जागेवरून उठण्याची मुभा असून जेवणही आपल्या डेस्कवरच घ्यावे लागते.

गुरुवारी फेसबुकने या वॉर रूमची एक झलक माध्यमांसमोर सादर केली. सध्या ब्राझीलमध्ये २८ ऑक्टोबर रोजी आणि अमेरिकेत ६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आली आहे. खोट्या बातम्या आणि माहिती चोरीमुळे त्रस्त झालेल्या फेसबुकने आता खोट्या बातम्या रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ही व्यवस्था करण्यात आली आहे.

फेसबुकच्या कॅलिफोर्नियातील मेन्लो पार्क येथील मुख्य कार्यालयात हे वॉर रूम स्थापन करण्यात आले आहे. येथे सुमारे दोन डझन कर्मचारी संगणकाच्या पडद्यावर लक्ष ठेवून असतात. येथील भिंतींवर कर्मचाऱ्यांना सावधानी बाळगण्याच्या प्रेरक सूचना देणारे पोस्टर लावले आहेत. या रूममध्ये ब्राझील आणि अमेरिकेचे झेंडे लागले असून घड्याळेही या दोन देशांतील वेळा दाखवत आहेत.

“आमच्याकडे २० हून अधिक टीम २० हजारांपेक्षा अधिक लोकांच्या प्रयत्नांमध्ये समन्वय साधतात. हे सर्व जण खोटी खाती व खोट्या बातम्या थांबविण्यासाठी काम करतात.

निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या कोणत्याही पोस्टला ती व्हायरल झाल्यावर एका तासाच्या आत काढून टाकू,” असे फेसबुकचे सिविक इंगेजमेंट प्रमुख समिध चक्रवर्ती यांनी माध्यमांना सांगितले.

Leave a Comment