राष्ट्रगीताचे विडंबन केल्याबद्दल चिनी मॉडेलला तुरुंगवास

yang
राष्ट्रगीताचे विडंबन केल्याबद्दल एका चिनी मॉडेलला पाच दिवसांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. चीनने काही वर्षांपूर्वी मंजूर केलेल्या राष्ट्रगीतासंबंधी कायद्यातील हे सर्वात हाय-प्रोफाईल प्रकरण ठरले आहे.

चीनमधील सोशल मीडिया स्टार यांग केली हिला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. ती २० वर्षांची आहे. यांगचे सोशल मीडियावर ४.५ कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. यांगचा गुन्हा एवढाच होता, की तिने ७ ऑक्टोबर रोजी एका लाईव्ह स्ट्रिमिंग व्हिडियोत ‘मार्च ऑफ दि
वॉलटिंयर्स’ हे चीनचे राष्ट्रगीत म्हटले होते. यावेळी ती आपले हात ऑर्केस्ट्रातील कंडक्टरप्रमाणे हलवत होती.

सर्व नागरिकांनी आणि संघटनांनी देशाच्या राष्ट्रगीताचा सन्मान केला पाहिजे आणि देशाच्या अखंडतेचे संरक्षण केले पाहिजे, असे शांघाई पोलिसांनी या संबंधात प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.राष्ट्रपति शी जिनपिंग यांच्या सरकारने २०१७ साली राष्ट्रगीताचा अपमान रोखण्यासाठी कायदा मंजूर केला होता. या कायद्यानुसार राष्ट्रगीताचा अपमान हे गुन्हेगारी कृत्य मानण्यात आले आहे. यात राष्ट्रगीताशी छेडछाड केल्सा १५ दिवसांच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र आता या शिक्षेचा अवधी वाढवून तो तीन वर्षे करण्याचा विचार चालू आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. एका सामन्यात चीनचे राष्ट्रगीत वाजल्यानंतर लोकांनी हूटिंग केल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले होते.

Leave a Comment