शिर्डीला पंतप्रधानांच्या भेटीला निघालेल्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात

trupti-desai
पुणे – सहकारनगर पोलिसांनी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना ताब्यात घेतले असून शबरीमाला प्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिर्डी येथे भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते. आज सकाळी त्या त्यानुसार शिर्डीला जाण्यासाठी निघाल्या असता त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सहकारनगर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

अयप्पा स्वामींच्या भक्तांकडून शबरीमला मंदिरात महिलांना मारहाण करण्यात आल्यामुळे गुरुवारी अहमदनगरच्या पोलीस अधिक्षकांना अर्ज लिहून पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी शिर्डीला जाणार असल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले होते. सहकारनगर पोलिसांनी त्यानुसार त्यांना ताब्यात घेतले. सकाळी आम्ही शिर्डीला जाण्यासाठी निघालो, तेव्हा पोलीस दलाने तेथे येऊन आम्हाला अडवले. एखाद्या गोष्टीचा निषेध करणे, हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. हा पंतप्रधान मोदींच्याद्वारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचे मत तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले आहे.

शबरीमला मंदिरात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरक्षित दर्शन का घेऊ शकत नाही? तसेच मंदिरात प्रवेश सुरू झाल्यानंतर महिला पत्रकारांना मारहाण करण्यात आली, त्यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. समानतेच्या विरोधात भाजपने भूमिका घेतली आहे का? तुम्ही आज याचा जाब विचारण्यासाठी आमची भेट पंतप्रधान मोदींशी घालून द्या, अन्यथा गांधीगिरी मार्गाने भूमाता ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्या त्यांचा ताफा अडवतील, असे त्यांनी अहमदनगरच्या पोलीस अधिक्षकांना केलेल्या अर्जात लिहिले होते.

Leave a Comment