पुण्यातील ही प्रसिद्ध हॉटेल्स आहेत सर्वात अस्वच्छ

hotel
पुणे – पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिशय नामांकित अशा हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे नुकतचे समोर आले असून ही बाब अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिलेल्या अहवालातून समोर आली आहे. हँगआऊटसाठी वैशाली, रुपाली आणि कॅफे गुडलक यांसारखी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल्सचा या यादीत समावेश असून एफडीएने दिलेल्या अहवालात या हॉटेलचे भटारखाने अतिशय गलिच्छ असल्याचे म्हटले आहे.

एफडीएचे हॉटेलच्या स्वच्छतेबाबत काही निकष असतात. हॉटेल्सकडून हे निकष पाळण्यात येतात का? याची पाहणी करण्यासाठी एफडीएने अचानक पाहणी केली असता याठिकाणी अस्वच्छता असल्याचे समोर आले आहे. सिझलर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या याना सिझलर्सचाही यामध्ये समावेश आहे. मोठ्या प्रमाणात कचरा वैशाली हॉटेलच्या भटारखान्यात होता, तसेच याठिकाणी अन्नपदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारी भांडीही खराब अवस्थेत असल्याचे या पाहणीत समोर आले आहे. स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला चमचमीत पदार्थ बनवून देणारे शेफही निष्काळजी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. अशीच रुपाली हॉटेलची स्थितीही असल्याचे समोर आले.

तर मध्य वस्तीतील प्रसिद्ध असणारे कॅफे गुडलक हे इराणी हॉटेलही अतिशय अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. याठिकाणच्या स्वयंपाकघरात कोळ्यांची जाळी आणि कचरा आढळला. एफडीएने या हॉटेल्सना या अस्वच्छ कारभारामुळे नोटीस दिली असून एफडीएचे नियम पाळावेत असे सांगण्यात आले आहे. तर वैशालीचे मालक शेट्टी यांनी एफडीएचे सर्व नियम पाळणे अवघड असल्याचे सांगितले. अशाप्रकारे एफडीएने अचानकपणे धाड टाकल्यास अजूनही असंख्य हॉटेल्स अस्वच्छ असल्याचे समोर येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment