जिओ ग्राहकांना बसणार न्यायालयाच्या ‘या’ निर्णयाचा सर्वाधिक फटका

JIO
मुंबई : देशभरातील ५० कोटी मोबाईल नंबर बंद होण्याची शक्यता असून सिम कार्ड खरेदी करताना ज्या ग्राहकांनी फक्त आधार कार्ड हेच ओळखपत्र म्हणून जमा केले होते, अशा ग्राहकांचे सिम कार्ड बंद होण्याची शक्यता असल्यामुळे देशभरातील मोबाईल युजर्स सध्या चिंतेत आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच महत्त्वपूर्ण निर्णय देत मोबाईल कंपन्या ग्राहकांच्या ‘केवायसी’ (know your customer) साठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा आदेश दिला होता. न्यायालयाच्या या निर्णयामुळेच मोबाईल कंपन्यांना ग्राहकांची आधारविषयक माहिती हटवावी लागेल. त्यामुळे ज्या ग्राहकांनी फक्त आधार कार्ड ‘केवायसी’ साठी जमा केले होते, आता त्यांना आपले दुसरे ओळखपत्र जमा करावे लागेल. अन्यथा त्यांचे सिम कार्ड बंद होणार आहे. ग्राहकांवरील हे संकट कसं दूर करता येईल, यासाठी सरकारी पातळीवर विचार सुरू आहे. टेलिकॉम विभागाकडून आधार प्राधिकरणाशी याबाबत बोलणे सुरू आहे.

टेलिकॉम सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सुवर्णमध्य साधण्यासाठी काय करता येईल, यासाठी बुधवारी मोबाईल कंपन्यांसोबत संवाद साधला. दरम्यान, न्यायालयाच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका जिओ ग्राहकांना बसणार आहे. कारण जिओ कंपनीने ग्राहकांकडून आधार हेच ओळखपत्र म्हणून स्वीकारले आहे. त्यामुळे जिओच्या २५ कोटी ग्राहकांना याचा मोठा फटका बसू शकतो.

Leave a Comment