साई संस्थानच्या माथी पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा तीन कोटींचा खर्च !

narendra-modi
अहमदनगर – १९ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिर्डीत साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याची सांगता होत आहे. पण ‘पंतप्रधान आवास योजने’ अंतर्गत बांधलेल्या घरांचे वाटपही याच सोहळ्यात उरकले जाणार असून सुमारे तीन कोटी रुपयांचा खर्च साईबाबा संस्थानच्या तिजोरीतून या कार्यक्रमाचा केला जाणार आहे. भाविकांच्या श्रद्धादानाचा असा सरकारी गैरवापर कितपत योग्य आहे, असा प्रश्न त्यामुळे उपस्थित झाला आहे.

भाविकांच्या दृष्टीने साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्याला एक भावनिक महत्त्व आहे. पण साईबाबांच्या विचारांवर मंथन होण्याऐवजी या कार्यक्रमात या घरवाटपासोबतच लोकसभा निवडणुकीचे रणशिंगही मोदी फुंकणार असल्याचे समजते. साईबाबा संस्थानने १८ ऑक्टोबर २०१७ ते १८ ऑक्टोबर २०१८ हे साईबाबा समाधी शताब्दी वर्ष साजरे केले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत या समाधी शताब्दी महोत्सवाची सांगता होत आहे. शताब्दी वर्षांनिमित्त शिर्डीच्या विकासासाठी साडेतीन हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला पण वर्ष संपत आले तरी तो सरकार दरबारी लालफितीत अडकून पडलेला आहे. हा निधी मिळण्याच्या आशा धूसर आहेत. समाधी शताब्दी सोहळ्याला केंद्र आणि राज्य सरकारने एक दमडीही दिली नसताना उलट संस्थानच्या तिजोरीवर तीन कोटी रुपयांचा हा डल्ला मारला जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लेंडी बागेत ध्वजावतरण होऊन समाधी शताब्दी सोहळ्याची सांगता होणार आहे. शेती महामंडळाच्या जागेत जाहीर सभेसाठी एक लाख लोक बसतील, असा आलिशान मंडप उभारण्यात आला आहे. या सभेच्या ठिकाणी ‘पंतप्रधान आवास योजने’ अंतर्गत बांधलेल्या घरांच्या प्रवेशासाठी नाशिक, नगर, औरंगाबाद, बीड आणि पुणे या पाच जिल्ह्यांतील ४० हजार लाभार्थ्यांना सरकारी खर्चाने आणण्यात येणार आहे, ई-गृहप्रवेशाचा कार्यक्रम पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार आहे. संस्थानच्या नव्या दर्शन रांगा, नवीन शैक्षणिक संकुल, साई नॉलेज पार्क, सौर ऊर्जा प्रकल्प यांचे अनावरणही मोदींच्या हस्ते होणार आहे.

Leave a Comment