देशाच्या भविष्याच्या रक्षणासाठी संघाच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा: कैलाश सत्यर्थी

kailash-satyarthi
नागपूर – आपण देशसेवा याचक किंवा आलोचक होऊन करु शकत नाही. आपण संवेदनशील, सर्वसमावेशक, स्वावलंबी आणि सुरक्षित भारत निर्माण करण्याचा संकल्प केला पाहिजे, असे मत नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यर्थी यांनी व्यक्त केले. आणखी किती दिवस आपण उदासीनता, तटस्थता आणि भीतीच्या सावटाखाली वावरणार आहोत, असा सवाल त्यांनी विचारला. देशाच्या वर्तमान आणि भविष्याच्या रक्षणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील रेशीमबाग मैदानावरील विजयादशमी उत्सवात नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यर्थी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कैलाश सत्यर्थी या कार्यक्रमात म्हणाले, या कार्यक्रमात मला आमंत्रित करुन संघाने फक्त भारतातीलच नव्हे तर जगभरातील कोट्यवधी शोषित आणि दुर्लक्षित लहान मुलांच्या दिशेने सन्मान आणि प्रेमाचा हात पुढे केला आहे. त्या सर्वांच्या वतीने मी संघाचा आभारी आहे.

फक्त सरकारवर आरोप करुन किंवा त्यांच्यावर खापर फोडून सशक्त राष्ट्र हे तयार होऊ शकत नाही. समाज जेव्हा मोठी स्वप्न बघणार आणि देशाला सर्वच क्षेत्रात पुढे नेण्याचा संकल्प करणार त्यावेळीच हा देश सक्षम होईल, असे त्यांनी सांगितले. गेल्या २० वर्षांमध्ये जगात बालकामगारांचे प्रमाण २६ कोटींवरुन १५ कोटींवर आले आहे. पण भारतात दुर्दैवाने अजूनही मुलींची जनावरांसारखी खरेदी विक्री होते, त्यांनी याकडेही लक्ष वेधले.

Leave a Comment