फेसबुकच्या गुंतवणूकदारांची मार्क झुकरबर्गला अध्यक्षपदावरुन हटवण्याची मागणी

facebook
फेसबुक या सोशल मीडिया कंपनीच्या गुंतवणूकदारांनी माध्यमाचा अध्यक्ष असलेल्या मार्क झुकरबर्गला हटविण्यात यावे अशी मागणी केली आहे. फेसबुकचा डेटा मागील काही दिवसांपासून हॅक होत असल्याच्या घटना जोर धरत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी होत आहे. कंपनीकडे हा प्रस्ताव इलियॉनिस, ऱ्होड आयलंड, पेन्सिवेनिया आणि न्यू यॉर्क सिटी कंट्रोलर स्कॉट स्ट्रींगर यांनी मिळून दिला आहे. मोठमोठ्या अॅसेट मॅनेजरचे या प्रस्तावाला समर्थन मिळेल असा या गुंतवणूकदारांचा अंदाज आहे. असे असले तरीही सध्या फेसबुकचे सर्वाधिक शेअर्स झुकरबर्ग याच्याकडेच आहेत. कंपनीकडून एप्रिल महिन्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार ही भागीदारी ६० टक्के एवढी असल्यामुळे हा प्रस्ताव स्वीकारला जाणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अशाप्रकारचा प्रस्ताव २०१७ मध्येही गुंतवणूकदारांनी कंपनीपुढे ठेवला होता. पण तो त्यावेळी धुडकावण्यात आला होता. केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात युजर्सचा डेटा चोरून त्याचा गैरवापर केल्याचेही समोर आले होते. अमेरिकन अध्यक्षांच्या निवडणुकीच्या वेळी फेसबुकमधील कर्मचाऱ्यांनी ८.७ कोटी युजर्सचा डेटा केंब्रिज अॅनालिटीकाशी शेअर केला होता. याबाबतची कबुलीही कंपनीने दिली होती. या प्रकरणामध्ये भारत सरकारनेही लक्ष घालून फेसबुकला नोटीस पाठवली होती. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी लोकांची माहिती लीक होत असेल तर हे नक्कीच धोक्याचे असल्याचे समोर आले होते.

Leave a Comment