हॉंगकॉंगचे सुपरस्टार चाऊ युन फॅट दान करणार ५ हजार कोटींची संपत्ती

fat
चाऊ युन फॅट हे हॉंगकॉंग मधील सुपरस्टार असले, तरी हॉलीवूड मध्ये देखील त्यांनी स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. चाऊ युन फॅट आता त्रेसष्ट वर्षांचे असून, गेली चाळीस वर्षे ते चित्रसृष्टीमध्ये कार्यरत आहेत. ‘अॅना अँड द किंग’, ‘क्राऊचिंग टायगर हिडन ड्रॅगन’ यांसारख्या अतिशय गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्या ‘क्राऊचिंग टायगर हिडन ड्रॅगन’ या चित्रपटाला २००१ साली निरनिरळ्या श्रेणींमध्ये दहा ऑस्कर पुरस्कारसाठी नामांकन प्राप्त झाले होते. त्यापैकी चार ऑस्कर पुरस्कार या चित्रपटाला मिळले होते.
fat1
इतकी प्रसिद्धी, संपत्ती आणि लोकप्रियता मिळविलेले चाऊ युन फॅट यांची जीवनशैली मात्र अतिशय साधी आहे. त्यांचे राहणीमानही तितकेच साधे आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दिखावा नाही. जिथे मोठमोठ्या सेलिब्रिटीज त्यांच्या आलिशान जीवनशैली साठी ओळखले जातात तिथे चाऊ यु फॅट सारख्या मातब्बर कलाकाराचा मासिक खर्च केवळ सात हजार रुपये इतका आहे. चित्रीकरणासाठी किंवा इतर कामांसाठी बाहेर जाताना चाऊ युन फॅट हे देखील सामान्य नागरिकांप्रमाणे बस किंवा ट्रेनमधून प्रवास करणे पसंत करतात. तसेच स्वतःची खासगी खरेदी करण्यासाठी ज्या दुकानांमध्ये सेल चालू असतील, तिथेच जाणे पसंत करतात.
fat2
इतकेच नाही, तर मोबाईल फोन नुकतेच जेव्हा प्रचलित होऊ लागले होते, तेव्हा खरेदी केलेला नोकियाचा फोन त्यांनी तब्बल सतरा वर्षे वापरला. अखेरीस हा फोन निकामी झाल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी एक नवा स्मार्ट फोन खरेदी केला. अश्या या कलाकाराची संपत्ती मात्र अफाट आहे. चाऊ ५,२६५ कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. चीनमधील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चाऊंचा, आपली सर्व संपत्ती दान करण्याचा मानस आहे. चार ऑक्टोबरच्या दिवशी चाऊ यांचा ‘प्रोजेक्ट ग्युटेनबर्ग’ नामक चित्रपट प्रदर्शित झाला असून, त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना चाऊ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सर्व संपत्तीचा त्याग करून आपल्याला आता सर्व सामन्यांप्रमाणे समाधानाचे आयुष्य जगायचे असल्याचे चाऊ म्हणाले. अमाप पैसा कमविणे महत्वाचे नसून, मनःशांती जास्त महत्वाची असल्याचे चाऊ म्हणतात. आपले आयुष्य अतिशय साधेपणाने, कोणत्याही गोष्टीची हाव न बाळगता जगणे हे सर्वात कठीण काम असल्याचे चाऊ सांगतात. चाऊंची पत्नी जॅस्मिन या देखील चाऊप्रमाणेच अतिशय साध्या राहणीमानाच्या पुरस्कर्त्या आहेत. अनेक सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करून समाजकल्याणकारी कार्यांमध्ये आपला खारीचा वाटा उचलाण्यामध्ये दोघे पतीपत्नी धन्याता मानतात. चाऊ दाम्पत्याला अपत्य नसून, आपली सर्व संपत्ती समाजाच्या विकासासाठी खर्च करण्याचा त्यांचा विचार आहे.

Leave a Comment