पितरांच्या आठवणीसाठी दक्षिण कोरियामध्ये साजरा होतो ‘थँक्स गिव्हिंग फेस्टिव्हल’

food
आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्यावर सतत असावेत, यासाठी निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळ्या परंपरा रूढ आहेत. भारतामध्येही पितृ पक्षामध्ये पूर्वजांसाठी श्राद्ध करण्याची परंपरा शतकानुशतके रूढ आहे. दक्षिण कोरिया देशामध्येदेखील ही पद्धत रूढ असून, येथे याला ‘च्युसेक’ ,’ऑटम इव्ह’, किंवा ‘हांगाउई’ या नावांनी ओळखले जाते. हा तीन दिवस साजरा केला जाणारा प्रसंग येथे एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा केला जात असतो.
food1
या दिवसांमध्ये कोरियन नागरिक आपल्या मायदेशी, आपल्या मूळ गावी परततात. तसेच तिथे जाताना आपल्याबरोबर शेतीतून मिळालेले थोडेसे उत्पन्न ही बरोबर नेतात. त्यानंतर सर्व परिवार एकत्र येऊन भोजनाचा आणि मद्यपानाचा आनंद घेतो. पण या वेळीही हे लोक आपल्या पूर्वजांना विसरत नाहीत. या दिवसांमध्ये पूर्वजांच्या स्मरणार्थ घरामध्येच पूजा, आणि इतर धार्मिक विधी पार पाडले जातात, किंवा पूर्वजांच्या समाधीवर शेतीतून मिळालेल्या उत्पन्नाचा लहानसा हिस्सा अर्पण केला जातो.
food2
या सणाच्या निमित्ताने शेतामध्ये पिकविले गेलेले अनेक पदार्थ संधींवर अर्पित केले जातात, तसेच उर्वरित पदार्थांचा वापर करून सर्व परिवारासाठी मेजवानी तयार केली जाते. या तीन दिवसांमध्ये घरामध्ये धार्मिक कार्याचे आयोजन करून पूर्वजांच्या समाधींच्या आसपास साफसफाई केली जाते. ही सव कार्ये सकाळच्या वेळीच पार पाडली जातात. शेतीचे चांगले उत्पन्न हा पूर्वजांचा आशीर्वाद असल्याचे मानून समाधींवर ही शेतीच्या उत्पन्नातून आलेले पदार्थ चढवून कृतज्ञता व्यक्त केली जात असते. म्हणूनच या सणाला कोरियन थँक्स गिव्हिंग या नावाने देखील ओळखले जाते.