जगातील सर्वात श्रीमंत देशामध्ये बेघर लोकांची संख्याही सर्वाधिक

home
जगामध्ये सर्वात श्रीमंत आणि बलशाली समजल्या जाणाऱ्या अमेरिकेमध्ये सध्या एक नवीन संकट उभे राहिले आहे. हे संकट आहे बेघर लोकांच्या संख्येमध्ये सातत्याने होंत असलेल्या वाढीचे. सर्व वयोगटांतील अनेक लोकांकडे रस्त्यांवर राहण्यावाचून इतर कोणताच पर्याय उपलब्ध नाही. थकल्यानंतर जिथे असतील तिथे जमिनीवरच पाठ टेकून विश्रांती घेणारे हे लोक, त्यांच्याकडे असणारे थोडे फार सामान एखाद्या मोठ्याश्या थैलीमध्ये घालून फिरताना दिसतात. हे लोक केवळ एखाद्या शहरापुरतेच मर्यादित नाहीत, तर बहुतेक सर्वच मोठ्या शहरांमध्ये असे बेघर लोक मोठ्या प्रमाणावर दृष्टीस पडू लागले आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक प्रशासने प्रयत्नशील असली, तरी भविष्यामध्ये हा प्रश्न आणखीनच बिकट होत जाणार असल्याचा तज्ञांचा कयास आहे.
home1
बीबीसी पत्रकार ह्युगो बाचेगा याने या समस्येचे सूक्ष्म अवलोकन करण्यासाठी पोर्टअंड नामक अमेरिकन शहराचा फेरफटका मारला. जागोजागी फुललेले गुलाबांचे ताटवे, अतिशय आल्हाददायक हवामान आणि समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडविणारे हे शहर नव्या विचारांचे केंद्र मानले जाते. सिलिकॉन फॉरेस्ट अशीही या शहराची ओळख आहे, कारण मोठमोठ्या कंपन्यांनी या ठिकाणी आपले उद्योग स्थापित केल्याने या ठिकाणी नोकऱ्यांच्या संधीच्या आकर्षणाखातर अनेक लोक इथे स्थलांतरित झाले खरे, पण मनाजोगती नोकरी न मिळाल्याने या लोकांच्या पदरी निराशाच आली. अशीच परिस्थिती न्यूयॉर्क, लॉसएंजिलीस, सॅन फ्रान्सिस्को इत्यादी प्रगत शहरांमध्येही पहावयास मिळत आहे.
home2
नोकरीच्या निमिताने हजारो लोक येथे स्थलांतरित होत असल्याने घरांची आवश्यकता ही मोठी आहे. पण वाढत्या लोकसंख्येच्या मानाने घरे मर्यादित प्रमाणात असल्याने, उपलब्ध असलेल्या घरांच्या किंमती सहज न परवडण्यासारख्या झाल्या आहेत. आधीच तुटपुंजी कमाई असलेल्या या लोकांना इतकी महाग घरे किंवा घरभाडे देऊन राहणे न परवडण्याजोगे असल्याने, या लोकांना रस्त्यांवर राहण्यावाचून पर्याय राहिलेला नाही. अनेक लोकांना त्यांचे मित्रपरिवार, आप्तेष्ट, किंवा सरकारी योजनांच्या अंतर्गत चालविल्या जात असलेल्या विश्रांतीगृहांनी आसरा दिला, पण तो ही काही काळापुरताच.
home3
अमेरिकेच्या पश्चिमी शहरांमध्ये बेघर लोकांची समस्या अधिक वाढली आहे. शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधामध्ये या शहरांमध्ये लोक येत असतात. या लोकांकडे कमाईचे साधन नसल्यामुळे घर घेऊन राहणे, किंवा भाडे भरून राहण्याची व्यवस्था यांना न परवडण्यासारखी असते. २०१७ साली केल्या गेलेल्या सर्वेक्षणामध्ये ५५३, ७४२ लोक मोठ्या शहरांमध्ये बेघर असल्याचे आढळून आले होते. यंदाच्या वर्षी ही संख्या आणखी वाढली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment