प्रामाणिक करदात्यांचा सरकार करणार सत्कार, सरकारी सेवांमध्ये प्राधान्य मिळणार

income-tax
देशात करांचा भरणा नियमितपणे करणाऱ्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अशा नियमित व प्रामाणिक करदात्यांचा सत्कार करणार आहे. तसेच अशा करदात्यांना विविध सरकारी सेवा व करविषयक कामांमध्ये प्राधान्य मिळणार आहे. या संबंधातील एका महत्त्वाकांक्षी धोरणावर काम चालू आहे, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्राप्तिकर खात्यासाठी धोरण निर्मिती करणारी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) या संस्थेची एक समिती हे धोरण आखत आहे, असे या अधिकाऱ्यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. हा प्रस्ताव आधी अर्थ मंत्रालयाकडून मंजूर करून घेण्यात येईल. त्यानंतर तो पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात येईल व तेथून मंजुरी मिळाल्यावर तो केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येईल, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या प्रस्तावानुसार, विमानतळ, रेल्वे स्थानक किंवा टोल नाक्यांसारख्या ठिकाणी प्रामाणिक करदात्यांना प्राधान्याने सेवा देण्यात येतील. तसेच जे नागरिक नियमितपणे कर भरतात किंवा रिटर्न फाईल करतात त्यांना सरकारी कार्यक्रमांमध्ये सन्मानाचे आमंत्रण द्यावे व सार्वजनिकरीत्या त्यांचा सत्कार करावा, असेही त्यात म्हटले आहे.

करदात्यांना मिळणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा करावी आणि प्रामाणिक करदात्यांना योग्य तो मान द्यावा, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत केली होती.

Leave a Comment