मुंगेरचे चंडिकामाता शक्तीपीठ

chandika
देशातील सतीच्या ५२ शक्तीपीठांपैकी एक असलेले बिहार मधील मुंगेर जवळचे चंडिका माता मंदिर प्रसिद्ध शक्तीपीठ असून येथे माता सती हिचा डावा डोळा पडला होता असे मानले जाते. या मंदिरात मातेच्या डोळ्याचीच पूजा केली जाते आणि येथे श्रद्धेने पूजा करणाऱ्या भाविकांच्या सर्व कामना पूर्ण होतात तसेच डोळ्यांचे सर्व विकार पूर्ण बरे होतात असे सांगितले जाते.

या मंदिरात भाविकांना पूजेनंतर प्रसाद म्हणून काजळ देण्याची प्रथा आहे. हे काजळ डोळ्यात घातले कि डोळ्याचे असाध्य रोगही बरे होतात असा भाविकांचा विश्वास आहे. वर्षभर देश विदेशातून येथे भाविक येत असतात मात्र नवरात्रात खूपच गर्दी होते. या मंदिराची कथा महाभारताशी जोडली गेली आहे. गंगाकाठी असलेल्या या मंदिराच्या पूर्व आणि पश्चिमेला स्मशान आहे त्यामुळे याला स्मशान चंडिका असेही नाव आहे.

dola
याची कथा अशी सांगतात कि कर्ण या देवीचा भक्त होता. तो रोज मंदिरात येऊन उकळत्या तेलात स्वतःचा देह झोकून देत असे आणि माता चंडिका त्याच्या अस्थिंवर अमृत वर्षाव करून त्याला पुन्हा जीवनदान देत असे आणि त्याला सव्वा मण सोने देत असे ते सोने कर्ण मुंगेर चौकांत दान म्हणून देत असे. उज्जैनच्या राजा विक्रमादित्याला हे समजेल तेव्हा तो वेश पालटून येथे आला आणि कर्ण पूजेला येण्याच्या अगोदर त्याने स्वतःचे शरीर उकळत्या तेलात झोकून दिले. देवीने त्यालाही जिवंत केले तेव्हा त्याने तीन वेळा हाच प्रकार केला. अखेर देवी प्रसन्न झाली आणि त्याला वर मागायला सांगितले.

विक्रमादित्याने देवीकडे सोने देणारा कलश आणि अमृतकलश मागितला व देवीने तो दिला. त्यामुळे विक्रमादित्य देवीचा सर्वात मोठा भक्त मानला जाऊ लागला. येथे चंडिकामातेच्या अगोदर विक्रमाचे नाव घेण्याची प्रथा असून श्री विक्रम चान्दिकाय नम; असा मंत्र म्हटला जातो. या मंदिरात कालभैरव, शिवगण आणि अन्य देवीदेवतांची मंदिरेही आहेत.

Leave a Comment