सरकार आणि नागरिकांच्या चिंतेचा विषय ठरलेल्या फेक न्यूजबाबत जनजागृती करण्यासाठी व्हाटसअप पथनाट्ये करणार आहे. राजस्थानमधील जयपूर येथून या उपक्रमाला सुरूवात करण्यात आली आहे.
फेक न्यूजबाबत जनजागृतीसाठी व्हाट्सअॅप करणार पथनाट्ये
रिलायन्स जिओच्या सहकार्याने व्हाट्सअॅपने हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये स्वस्तातील जिओफोनवर व्हाट्सअॅप कसे इन्स्टॉल करायचे आणि कसे वापरायचे, याचेही प्रशिक्षण देण्यात येत आहे. देशातील 10 शहरांमध्ये अशा प्रकारची पथनाट्ये होणार आहेत.
व्हाट्सअॅप आणि जिओचे शेकडो कर्मचारी या उपक्रमात सहभागी झाले असून व्हाट्सअॅपचे काही कर्मचारी कॅलिफोर्नियातून आले आहेत. “जगात आजवरचा सर्वाधिक मोठा सार्वजनिक प्रबोधनाचा उपक्रम राबविण्याचे आमचे लक्ष्य आहे,” असे व्हाट्सअॅपच्या एका प्रवक्त्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेला सांगितले.
जानेवारी 2017 पासून 30 जणांचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू झाला असून व्हाट्सअॅपवरून पसरविलेल्या खोट्या माहितीचा त्यात मोठा भाग आहे, असे मानले जाते. या संदर्भात केंद्र सरकारने बनावट आणि प्रक्षोभक माहितीचा प्रसार केल्याबद्दल व्हाट्सअॅपला ताकीद दिली होती. गेल्या महिन्यात व्हाट्सअॅपने मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी पाच चॅटची मर्यादा घालून दिली होती. जगात व्हाट्सअॅपचे सर्वाधिक जास्त म्हणजे 20 कोटी वापरकर्ते भारतात आहेत.