तक्रार देण्यास गेलेल्या महिलेचा पोलिसानेच केला विनयभंग

police
पुणे : पुण्यातील चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साने चौकीमध्ये तक्रार देण्यासाठी आलेल्या एका महिलेचा पोलीस कर्मचाऱ्याने विनयभंग केला असल्याची घटना घडली आहे.

गुन्हा दाखल झालेल्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आर. व्ही. पालवे असे आहे. ३६ वर्षीय महिलेने याबाबत चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने मंगळवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास तिला मारहाण केली. तसेच घरातील सामानाची मोडतोड केल्यामुळे घर मालकाने याबाबत त्यांना विचारणा केली. पीडित महिला पतीच्या विरोधात तक्रार देण्यासाठी साने चौक येथे रात्री अकरा वर्षांच्या सुमारास आली.

त्यावेळी तेथे कर्तव्यावर आलेल्या पालवे याने महिलेच्या खांद्यावर हात ठेवत तिचा विनयभंग केला. त्यानंतर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास पालवे याने पीडित महिलेला फोन करून सर्व काही ठीक आहे ना? अशी विचारणा केली. तसेच फोन ठेवण्याच्या वेळी त्याने पीडित महिलेला ‘आय लव्ह यू’ असेही म्हटले. ही बाब पीडित महिलेने काँग्रेसच्या शहराध्यक्षा गिरीजा कुदळे यांना सांगितली. कुदळे यांनी त्यानंतर पीडित महिलेला घेऊन चिखली पोलिस ठाणे गाठले. तसेच विनयभंग करणाऱ्या पालवे यांच्या विरोधात फिर्याद दिली. बुधवारी चिखली पोलिस ठाणे कार्यान्वित झाले. त्या अगोदर अवघ्या तासाभरापूर्वी ही घटना घडली. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Leave a Comment