महिलेवर अश्लिल शेरेबाजी केल्याप्रकरणी पंकजा मुंडे समर्थकांवर गुन्हा दाखल

pankaja-munde
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बीड येथील सभेवर सोशल मीडियावर झालेल्या कॉमेंटवरुन पुण्यातील महिला कार्यकर्त्यांवर टीकाटिप्पणी करुन अश्लिल शेरेबाजी करणा-या महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या समर्थकांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आसाराम सानप, सुनिल एन फड, मनोज मुंडे, पोपट फुंदे, सुशेन नागरगोजे, दादा कुटे, योगेश देवरे, ज्ञानदेव खेडकर, सॅम गदादे, शरद वाघ, महेश एन एम मुंडे, गणेश नागरे, श्रीकांत घोळवे, दिनेश मुंडे अशी आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांची १ आॅक्टोबरला बीडमध्ये जाहीर सभा झाली होती. पंकजा मुंडे यांनी या सभेनंतर आपल्या जिल्ह्यात लक्ष घालावे, अशी टीका केली होती. पुण्यातील महिला कार्यकर्तीने त्यावर ‘ताई स्वत: ला सावरा’ अशी पोस्ट सोशल मीडियावर अपलोड केली. असंख्य कार्यकर्त्यांनी याला लाईक व कॉमेंट दिल्या. त्यानंतर या महिला कार्यकर्त्याला मुंडे समर्थकांकडून ट्रोल करण्यात आले. राजकीय पातळी सोडून त्यांनी वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यास सुरुवात केली. कुटुंबाबरोबरचा त्यांचा फोटो टाकून त्यावर अश्लिल शेरेबाजी करण्यात आली. यामुळे आपली राजकीय व सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या मनास त्यामुळे लज्जा उत्पन्न झाली व कुटुंबास मानसिक त्रास झाला असे फिर्यादीत म्हटले आहे. त्यांनी अगोदर गुन्हे शाखेकडे अर्ज केला होता. त्यानंतर तो सिंहगड रोड पोलिसांकडे आला. सिंहगड पोलिसांनी ५००, ५०१, ५०९ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment