यूजर्सचा वैयक्तिक डेटा चोरीला गेल्याचे फेसबुकने केले मान्य

facebook
नवी दिल्ली – यूजर्सचा वैयक्तिक डेटा चोरीला गेल्याचे सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकने मान्य केले असून जवळपास तीन कोटी यूजर्सचा डेटा हॅकर्सनी हॅक केल्याची माहिती फेसबुकने एका ब्लॉगच्या माध्यमातून दिली आहे.

ब्लॉगनुसार मागील महिन्यात जवळपास ३ कोटी यूजर्सच्या अकाउंटची सुरक्षाप्रणाली हॅकर्सनी भेदली होती. या ३ कोटी यूजर्सपैकी २ कोटी ९० लाख यूजर्सच्या फेसबुक अकाउंटचा डेटा चोरी गेल्याचे समोर आले आहे. ५ कोटी यूजर्सचे अकाउंट हॅक मागील महिन्यात झाल्याचे फेसबुकने म्हटले होते. त्यानंतर हॅकर्सनी हॅक केलेल्या अकाउंट्सबद्दल डिटेल मागण्यात आल्यानंतर फेसबुकच्या उपाध्यक्षांनी ही माहिती दिली आहे.

अहवालानुसार हॅकर्सनी जवळपास १.५ कोटी यूजर्सची नावे आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स चोरी केले. यामध्ये फोन नंबर, ईमेल आणि प्रोफाईलचा समावेश आहे. तर यामध्ये १.४ कोटी असे यूजर्स आहेत ज्यांची नावे, कॉन्टॅक्टच्या व्यतिरिक्त प्रोफाईलशी संबंधित अन्य माहितीही हॅक करण्यात आली आहे. यामध्ये यूजरनेम, जेंडर, भाषा, रिलेशनशीप, धर्म, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता आणि शेवटी कोणत्या दहा ठिकाणांना भेट दिली याची माहिती सामिल आहे. कंपनीने सांगितले, की आम्ही एफबीआयला यासंबंधी पूर्ण सहयोग करत आहोत.

५ कोटी यूजर्सचे अकाउंट हॅक झाल्याची माहिती गेल्या महिन्यात समोर आली होती. कंपनीने यानंतर ‘View As’ हे फिचर हटवले होते. कंपनीचे म्हणणे होते, की या फिचरच्या माध्यमातून अटॅकर्सनी फेसबुकचे अॅक्सेस टोकन चोरी केले होते. त्यामुळे त्यांना काही प्रमाणात दुसऱ्यांचे अकाउंट हॅक करण्यात यश मिळाले. पण आमच्याकडे तेव्हा यासंबंधी सविस्तर माहिती नव्हती की या फिचरच्या माध्यमातूनच अकाउंट हॅक करण्यात आले आहेत, असे कंपनीने म्हटले आहे. मात्र, आता कंपनीने स्पष्ट केले आहे, की जवळपास २.९ कोटी यूजर्सचे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आले होते.

Leave a Comment