कामाचा तणाव, वैयक्तिक संबंधांतून निर्माण झालेले तणाव, आर्थिक समस्या या आणि अश्या इतर अनेक समस्यांमुळे येणारे नैराश्य जगभरामध्ये अनेक आत्महत्यांना कारणीभूत ठरत आहे. इंग्लंडमध्ये ही आत्महत्या होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, यावर त्वरीत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने, इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी खास मंत्रालयाची स्थापना केली आहे.
देशभरामध्ये वाढत असलेले आत्महत्यांचे प्रमाण लक्षात घेऊन हे प्रमाण कश्यामुळे वाढत आहे, आणि हे कमी करण्यासाठी कोणती पावले उचलता येतील हे पाहण्याची जबाबदारी या मंत्र्यांची असणार आहे. लंडनमध्ये नुकत्याच आयोजित झालेल्या मानसिक स्वास्थ्य शिखर संमेलनाच्या निमित्ताने पंत प्रधान थेरेसा मे यांनी ही घोषणा करीत, ही जबाबदारी जॅकी डॉयल प्राईस यांना सुपूर्त केली. या शिखर संमेलनासाठी जगभरातून पन्नास देशांच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती.
इंग्लंड मध्ये समाजकल्याण क्षेत्रामध्ये ‘samaritans charity’ ही संस्था अग्रणी असून, मानसिक तणावाने, नैराश्याने ग्रस्त, आणि आत्महत्येस प्रवृत्त होत असलेल्या लोकांचे काउन्सेलिंग करण्यासाठी आणि त्यांना धीर देऊन मानसिक तणावातून मुक्त करण्यासाठी ही संस्था कार्यरत असते. मानसिक तणावाने ग्रस्त व्यक्तींसाठी अनेक हेल्पलाईन्स देखील या संस्थेतर्फे चालविल्या जातात. त्याच्या या कामासाठी पंतप्रधान मे यांनी १.८ मिलियन पाउंड आर्थिक निधी दिला आहे. सध्या इंग्लंडमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून, दर वर्षी साडेचार हजार लोक इंग्लंडमध्ये आत्महत्या करीत असल्याचा खुलासा एका सर्वेक्षणाद्वारे केला गेला आहे.