स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या मुंबई शाखेत २८ कोटी रूपयांवर डल्ला

cyber-crime
मुंबई – स्टेट बँक ऑफ मॉरिशसच्या राजधानी मुंबईतील नरिमन पॉईंट येथील शाखेत १ ऑक्टोबर ते २ ऑक्टोबर दरम्यान सायबर चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकिंग सिस्टिम हॅक करून सायबर चोरांनी तब्बल १४३ कोटी रूपयांवर हात साफ करण्याचा प्रयत्न केला होता. पण बँकेने तत्काळ सिस्टिम अलर्ट केल्याने नुकसान टळले. पण तरीही चोर २७ ते २८ कोटी रूपयांवर डल्ला मारण्यात यशस्वी झाल्याचे वृत्त आहे.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे बँकेच्या तक्रारीवरून तक्रार करण्यात आली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. यावेळी बँकेचा सर्व्हर हॅक करून खात्यातून पैसे परदेशातील खात्यात पाठवल्याचा आरोप बँकेने केला आहे. हे हॅकींग अद्याप कसे झाले, मालवेअरमुळे झाले की त्याला बॅंकेतील कोणी कर्मचारी जबाबदार आहे हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेले नाही.

अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. बँक आणि आर्थिक गुन्हे शाखा प्रकरणाचा तपास करत आहे. सध्या देशातील अनेक बँकांना हॅकर्सनी लक्ष्य केले आहे. गेल्या काही दिवसांतील ही तिसरी घटना आहे. महिन्याभरापूर्वी कॉसमॉस बँकेच्या पुणे शाखेतून ९४ कोटी रूपये हॅकर्सनी लंपास केले होते. तर युनिअन बँकेच्या बाबतही अशाच प्रकार घडला होता. बँकेतून ३४ कोटी रूपये काढण्यात आले.

Leave a Comment