डोकेदुखीने त्रस्त झालेल्या रुग्णाचा स्कॅन पाहून डॉक्टरही भयचकित

nail
चीन मधील चोंगयांग शहरामध्ये राहणारे त्रेचाळीस वर्षीय हु, एका सिमेंट बनविणाऱ्या कारखान्यामध्ये सुपरवायझर म्हणून कामाला आहेत. गेले काही दिवस हु डोकेदुखीने त्रस्त होते. सुरुवातीचे काही दिवस हु यांनी डोकेदुखीकडे फारसे लक्ष दिले नाही. अपुरी झोप, पित्त, कामाचा ताण या कारणांमुळे डोकेदुखी उद्भविली असेल अशी त्यांची समजूत होती. मागील आठवड्यामध्ये डोकेदुखी अचानक वाढल्यानंतर जेव्हा हु इस्पितळामध्ये गेले तेव्हा त्यांना डोक्याचा सी टी स्कॅन करण्याचा सल्ला दिला गेला.

इस्पितळामध्ये स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांना जे चित्र दिसले, ते पाहून तिथे उपस्थित सर्वचजण आश्चर्याने थक्क झाले. स्कॅन मध्ये ४८ मिलीमीटर लांबीचा खिळा हु यांच्या कवटीमध्ये घुसला असल्याचे स्कॅन मध्ये पाहून हु च्या डोकेदुखीचे कारण डॉक्टरांना समजले. हा खिळा हु यांच्या कवटीमध्ये पाहून सर्वांना आश्चर्य तर वाटलेच, पण त्याहूनही धक्कादायक गोष्ट अशी, की हा खिळा आपल्या डोक्यामध्ये कसा घुसला याची हु ना अजिबात कल्पना नव्हती.
nail1
हा खिळा हु यांच्या कवटीच्या उजव्या बाजूला रुतलेला असल्याचे स्कॅन वरुन स्पष्ट झाले आहे. हु यांचे काम सिमेंट कारखान्यामध्ये असले, तरी तेथील सिक्युरिटी फुटेजवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्याच्यावर असल्याने कामाच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या खिळ्यांशी किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या हत्यारांशी आपला काहीच संबंध येत नसल्याचे हु म्हणतात. त्यामुळे हा खिळा हु यांच्या डोक्यामध्ये कसा आणि केव्हा घुसला हे न उकलणारे गूढ होऊन बसले आहे. पण सध्या तरी या गुढाची उकल करण्याचे काम बाजूला सारून, हु यांच्या डोक्यातून हा खिळा बाहेर काढण्यासाठी त्यांना मोठ्या इस्पितळामध्ये धाडण्यात आले आहे.

Leave a Comment