आगामी ४८ तास ठप्प होऊ शकते इंटरनेट सेवा

internet
नवी दिल्ली – आज जगभरातील इंटरनेट वापरकर्त्यांना नेट वापरताना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रमुख डोमेन सर्व्हर्सच्या नियमित देखरेखीसाठी आज त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. काही समस्या असल्यास ती दूर करण्यात येणार असल्यामुळे पुढील ४८ तास इंटरनेटची सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

रशियन वृत्तसंस्थेने यासंबंधी खात्रीलायक वृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रमुख डोमेन सर्व्हरचा नियमित देखरेखीचा भाग म्हणून आज त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे इंटरनेटची सेवा वापरताना यूजर्सला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या सर्व्हरची आज इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाईंड नेम्स अँड नंबर्स (आयसीएएनएन) देखरेख करणार आहे.

क्रिपटोग्राफिक की (इंटरनेट अँड्रेस बुक आणि डोमेन नेम सिस्टिम सुरक्षित ठेवण्यासाठी याचा वापर करण्यात येतो)आज बदलण्यात येणार आहे. ही विशेष खबरदारी सध्या झालेल्या सायबर हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत असल्याचे आयसीएएनएनने सांगितले. पुढील ४८ तास नेटचा वापर करताना यूजर्सला काही समस्या उद्भवू शकतात. ऑनलाईन व्यवहार करताना वेब पेज अॅक्सेस करतानाही अडचण येऊ शकते. मात्र, लवकरच ही समस्या सोडवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Comment