अमृतसरच्या बडा हनुमान मंदिरात वानरजत्रा सुरु

badahanuman
नवरात्रात देशभरात देवीच्या अनेक मंदिरातून जत्रा सुरु होतात आणि देवीपूजनाची एकच धूम देशात माजलेली असते. मात्र पंजाबच्या सुवर्णनगरी अमृतसर मधील बडा हनुमान मंदिरात मात्र नवरात्रात वानर जत्रा सुरु होते आणि ती १० दिवस सुरु राहते.

या हनुमान मंदिरात ज्यांना नवसाने मुलगा झाला आहे अशी जोडपी या मुलांना घेऊन देशभरातूनच नव्हे तर परदेशातून नवसफेडीसाठी येतात. या मुलांना १० दिवस लाल रंगाचे जरीचे विशिष्ट प्रकारचे कपडे घातले जातात, तोंडावर हनुमानाचा मुखवटा घातला जातो. हातात छडी दिली जाते. कार्तिक महिन्यात होणारया या जत्रेत अश्या वेशातील शेकडो लहान मुले मंदिर परिसरात दिसतात म्हणून त्याला लंगुर मेळा असे म्हटले जाते. या काळात मंदिरावर रोषणाई केली जाते आणि हनुमान मूर्तीला सोन्याचा मुकुट घातला जातो. हि मूर्ती स्वयंभू आहे असे सांगतात. मूर्ती बसलेल्या स्थितीत असून हनुमान आराम करतो आहे असे वाटते.

Untitled-1
या प्राचीन मंदिराची कथा अशी सांगितली जाते, जेव्हा श्रीरामाने अश्वमेध यज्ञ करून घोडा सोडला तेव्हा लव आणि कुश या रामपुत्रांनी येथेच तो अडविला होता. तेव्हा घोड्याला सोडविण्यासाठी आलेल्या हनुमानाला लव कुश यांनी येथील वडाच्या झाडाला बांधून घातले. आजही हे झाड येथे आहे.

हनुमानाला नवस करून झालेली आणि नवसफेडीसाठी आलेली हि चिमुकली मुले या काळात मंदिरातच मुक्काम करतात. त्यांच्यासाठी तशी व्यवस्था केली जाते मात्र त्यांना काही नियम पाळावे लागतात. या नऊ दिवसात या मुलांनी सुई दोरा हातात धरायचा नाही. शाकाहारी जेवण घ्यायचे, दुसऱ्याचा घरात जायचे नाही, कात्री वापरायची नाही, दररोज ११ वेळा हनुमान चालीसा म्हणायचे. त्यानंतर विजयादशमीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी रावण व मेघनाद याच्या पुतळ्यात बाण मारायचे आणि शेजारी असलेल्या छोटा हनुमान मंदिरात दर्शन घेऊन अंगावरचे लाल कपडे उतरवायचे अशी हि पध्दत आहे.

Leave a Comment