दुचाकी गाडीच्या किंमतीपेक्षा हेल्मेटची किंमत जास्त !

helmet
भारतामध्ये दुचाकी गाडी चालविताना हेल्मेट घालण्याची आवश्यकता लोक फारशी मनावर घेतातच असे नाही. अनेक शहरांमध्ये हेल्मेट वापरणे बंधनकारक असले, तरी ज्या ठिकाणी या नियमाचे काटेकोर पालन होत नाही अश्या ठिकाणी या नियमाचा भंग करणारेच जास्त पहावयास मिळतात. दुचाकी चालविणाऱ्या व्यक्तीसाठी आणि त्याच्यासमवेत त्याच्या मागील सीटवर बसणाऱ्यासाठीही हेल्मेट घालणे आवश्यक आहे. दोघांच्या सुरक्षिततेसाठी हे महत्वाचे आहे. बाजारामध्ये अनेक देशी विदेशी कंपन्यांनी तयार केलेली हेल्मेट उपलब्ध आहेत. पण आता एक असे हेल्मेट बाजारामध्ये उपलब्ध होत आहे, ज्याची किंमत सध्या लोकप्रिय असलेल्या दुचाकी वाहनाच्या किंमतीहून अधिक आहे. या हेल्मेटमध्ये असे विशेष काय आहे, हे जाणून घेऊ या.
helmet1
हे हेल्मेट शुबर्थ या प्रसिद्ध कंपनीने बनविले असून, हे जर्मनीहून आयात केले गेले आहे. शुबर्थ हेल्मेटच्या ‘सी-4’ मॉडेलची किंमत जर्मन बाजारपेठेमध्ये तब्बल सत्तर हजार रुपये आहे. पण भारतामध्ये आयात केल्यानंतर त्यावरील लागणारे सर्व कर मिळून ही किंमत भारतीय बाजारपेठेमध्ये नव्वद हजार रुपये इतकी आहे. शुबर्थ हा अतिशय प्रसिद्ध ब्रँड असून, यांच्या हेल्मेट्सचा वापर जागतिक पातळीवरील फॉर्म्युला वन रेसेस आणि मोटरसायकल रेसेसमध्ये केला जात असतो. फॉर्म्युला वन चँपियन लुईस हॅमिल्टन देखील याच हेल्मेटचा वापर करताना दिसतो.
हे हेल्मेट अतिशय ‘सायलेंट’ हेल्मेट म्हणून ओळखले जाते. या हेल्मेटच्या आतमध्ये, विशेषतः कानांच्या वर एक प्रकारचे जाडसर लायनिंग दिले गेले असून, त्यामुळे रस्त्यावरील इतर आवाजांचा गोंगाट हेल्मेटधारकाच्या कानांपर्यंत अगदी कमी प्रमाणात पोहोचतो. या हेल्मेटमध्ये मायक्रोफोन इंस्टॉल केला गेला असून, अतिरिक्त कम्युनिकेशन डिव्हाइस द्वारे संभाषणही करता येऊ शकते. शुबर्थ सी-४ या हेल्मेटला जागतिक मान्यता असलेले सेफ्टी सर्टिफिकेशन दिले गेले आहे.

हे हेल्मेट अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापरकरून बनविले गेले आहे. हे हेल्मेट फायबरग्लासचा वापर करून बनविले गेले असल्याने हे वजनाला अतिशय हलके (१.८१ किलोग्राम) असले, तरी त्याचबरोबर अतिशय दणकट देखील आहे. या हेल्मेटच्या आतमध्ये वापरले गेलेले लायनिंग अँटीबॅक्टेरियल असून, हेल्मेटच्या आतमधील आर्द्रता झपाट्याने शोषून घेणारे आहे. हे हेल्मेट ‘मोड्युलर’ असून, हे हनुवटीपासून दुमडता येऊन त्याचा ‘हाफ हेल्मेट’ म्हणून वापरही करता येतो. हा हेल्मेटवर लावले गेलेले विंडशिल्ड ‘अँटी फॉग’, म्हणजेच दमट हवेमध्ये धूसर न होणारे आहे. त्यामुळे हे हेल्मेट पावसाळ्याच्या दिवसांमध्ये देखील सहज वापरता येणारे आहे. या हेल्मेटमध्ये अनेक एअर व्हेंटस् दिले गेले असून, त्यामुळे हेल्मेटच्या आत ही हवा खेळती राहणार आहे.