‘आय लव्ह यु शिवडे’ नंतर पुण्यात होत आहे ‘या’ फ्लेक्सची चर्चा

flex
पुणे – आपल्या सर्वांनाच ‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण तर माहीतच आहे. पण कोणीही पुणेकरांच्या कोणत्याही बाबतीत शक्कल लढवण्याच्या विचारशक्तीला आव्हान देऊ शकत नाही हेही तेवढे खरे आहे. काही दिवसांपूर्वी एका प्रियकराने पिंपरी चिंचवडमध्ये आपल्या मैत्रिणीला उद्देशून ‘आय लव्ह यु शिवडे’ असे फ्लेक्स शहरभर लावले होते. त्याची जोरदार चर्चा सोशल मिडिया आणि प्रसार माध्यमांतून झाली. त्याच प्रकारे आता पिंपरी चिंचवडमध्ये ‘स्मार्ट बायका जातात कुठे? या जागेवर लक्ष ठेवा! १५ ऑक्टोबर’ अशी पोस्टरबाजी करण्यात आल्यामुळे सध्या संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये या पोस्टरची चर्चा होत आहे.

पुण्यात पुणेरी पाट्या प्रसिद्ध आहेतच. “स्मार्ट बायका जातात कुठे..? या जागेवर लक्ष ठेवा! १५ ऑक्टोबर” अशा प्रकारचे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरले असून हे पोस्टर जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील आकुर्डी ते साने चौकादरम्यान लागले आहेत. आगामी सण-उत्सव लक्षात घेता आणि या पोस्टर वरील मजकूर बघता एखाद्या साड्यांच्या दुकानाची ही जाहिरात असावी, असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे. पण ही जाहिरात आहे की आणखी काही याचा उलगडा १५ ऑक्टोबरलाच होणार असे दिसून येते. पण ही जाहिरात असेल, तर अस्सल पुणेरी शक्कल लढवून ही जाहिरात करण्यात आली आहे. पण काही दिवसांपूर्वीच्या “आय लव्ह यु शिवडे” च्या फ्लेक्स नंतर जणू काही आशा पोस्टरचा ट्रेंड आला आहे की काय, अशी शंका प्रत्येक पिंपरी चिंचवडकराला येऊ लागली आहे. पण सध्या आकुर्डी ते साने चौक या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनचालकांचे लक्ष हे पोस्टर वेधून घेत आहे.