लहानग्याने पेपर श्रेडर मशीनमध्ये केल्या हजारो डॉलर्सच्या चिंध्या

dollar
घरातील लहान मुलांच्या हाती कधी कोणती वस्तू लागेल, आणि त्यांचा उपयोग ते नेमका कसा करतील हे देवही सांगू शकणार नाही. अनेकदा लहान मुलांच्या हाती नको त्या वस्तू लागल्याने लहान मोठ्या आपत्ती देखील ओढवत असल्याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. पण एका लहानग्याच्या हाती, काही हजार डॉलर्सच्या नोटा लागल्या आणि त्याने त्या नोटा चक्क पेपर श्रेडरमधून काढून त्यांच्या चिंध्या करून टाकल्या.
dollar1
आजकाल जुनी कागदपत्रे, किंवा जुनी बिले इत्यादी केवळ फाडून फेकण्याऐवजी पेपर श्रेडर नामक मशीन मधून ही कागदपत्रे, किंवा इतर फेकून देण्याजोगे कागद टाकून त्याच्या चिंध्या करून टाकण्याची पद्धत बहुतेक सर्वच ऑफिसेसमध्ये आणि पाश्चात्य देशांमध्ये प्रत्येक घरामध्येही रूढ आहे. अमेरिकेतील युटाह येथे वास्तव्यास असणाऱ्या बेन आणि जॅकी बेलनॅप या दाम्पत्याच्या दोन वर्षे वयाच्या मुलाने देखील नको असलेले जुने कागद श्रेडरमधे घालताना आपल्या आईवडिलांना अनेकदा पहिले होते. जॅकी आणि बेन यांना यंदाच्या वर्षी होणार असलेल्या फुटबॉल सामन्यासाठी जायचे असल्याने त्यासाठी दोघांनी काही पैसे बाजूला ठेवले होते. सामना पाहण्यास जाण्यासाठी येणारा सर्व खर्च एकरकमी देणे शक्य नसल्याने दोघे जण आपापल्या पगारांमधून थोडे थोडे पैसे दर महिनाला बाजूला काढीत असत.
dollar2
बेन आणि जॅकीने साठविलेल्या पैशांचा हा लिफाफा कसा कोण जाणे, पण त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाच्या हाती लागला. त्यांच्या मुलाला श्रेडरचे आकर्षण आधीपासूनच होते, आणि आईवडिलांना जुने कागद या मशीनमध्ये घालताना त्याने अनेकदा पाहिलेही होते. डॉलर्सच्या नोटांचे महत्व या लहानग्याला थोडीच कळणार होते ! त्याच्या हाताला या नोटा लागताच त्याने अजिबात वेळ वाया न घालविता त्वरेने श्रेडरच्या दिशेने मोर्चा वळविला आणि या नोटा त्वरित श्रेडरमधून घालून त्यांच्या चिंध्या करून टाकल्या.
dollar3
श्रेडरचा आवाज ऐकून तिथे आलेल्या बेन आणि जॅकीला घडलेला प्रकार लक्षात येताच, त्यांची क्षणभर वाचाच बसली. इतके महिने साठविलेल्या पैशांच्या चिंध्या पाहून त्यांना हसावे की रडावे हेच कळेनासे झाले. पण त्यांच्या मुलाने हा कारनामा अजाणतेपणी केला असल्यामुळे त्याला त्याबद्दल न रागावता, हा अनुभव कथन करणे मोठे रोचक ठरेल असे समजून बेनने हा अनुभव ट्वीटर वरुन शेअर केला. तसेच नोटांच्या चिंध्या आणि आपल्या मुलाचे छायाचित्र देखील बेनने शेअर केले आहे. मात्र त्याच्या सुदैवाने अश्या प्रकारच्या फाटलेल्या नोटा बदलून मिळण्याची सोय असल्यामुळे सरकारी चौकशी पूर्ण होताच हे पैसे बेनला, काही महिन्यांनी का होईना, पण परत मिळणार आहेत.

Leave a Comment