२८०० वर्षे जुने येरेवान अतिशय सुंदर शहर

yerwan
जगात साधारण २ हजार वर्षापेक्षा जास्त काळ वस्ती असलेल्या शहरांना प्राचीन शहरे म्हटले जाते. इटलीतील रोम इटर्नल शहर म्हणून ओळखले जाते तसेच भारतातील वाराणसी प्राचीन नगरी किंवा स्वर्ग नगरी म्हणून प्रसिद्ध आहे. सोविएत संघातून फुटून निघाल्यावर सध्या स्वतंत्र भोगत असलेल्या अर्मानिया या चिमुकल्या देशाची राजधानी येरेवान हे असेच प्राचीन शहर असून हे शहर २८०० वर्षे जुने असल्याचे इतिहास सांगतो.

या देशाची लोकसंख्या आहे ३० लाख. मात्र या देशाचे नाव जगात प्रसिद्ध झाले ते येथे झालेल्या वेलवेट क्रांतीमुळे. दीर्घकाळ पंतप्रधान राहिलेल्या नेत्यास त्याचे पद सोडून पायउतार होण्यासाठी हि शांतापूर्ण क्रांती केली गेली आणि ती जगात गाजली. येरेवान हे शहर प्राचीन असले तरी अति सुंदर, शांत आहे आणि त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी नेहमीच होते.

yerwan1
येथील नागरिक अतिशय मोकळ्या मनाचे आणि चटकन मैत्री करणारे आहेत. खाणे पिणे आणि गप्पा हे त्यांना अति प्रिय. या शहरातील बहुतेक सर्व लोक एकमेकांना ओळखतात. शहरातील सर्व नागरिक आमचे मित्र, शेजारी आणि सहकारी आहेत असे येथील नागरिक सांगतात. या लोकांना परदेशी भाषा चटकन आत्मसात करण्याचे अनोखे कौशल्य लाभले आहे. पर्यटकही त्यांच्या या कौशल्याने आश्चर्यचकित होतात. येथे इंग्रजी, रशियन,, फ्रेंच, स्पॅनिश आणि फारसी भाषा बोलल्या जातात.

या शहरात सतत काही न काही उत्सव साजरे होत असतात. त्यात भारतातील होळी प्रमाणे वर्दावर नावाचा उत्सव ख्रिसमस नंतर येतो. तसेच नवविवाहितानी पेटविलेल्या आगीवरून उडी मारण्याचा एक खास सण असतो. हे शहर इतके छोटे आहे कि संपूर्ण गाव २० मिनिटात या टोकापासून त्या टोकापर्यंत फिरता येते. येथील इमारती जयपूर मधील इमारतीप्रमाणे गुलाबी रंगाच्या आहेत त्यामुळे या शहरालाही पिंक सिटी म्हटले जाते.

कॅन्टोन हा येथील मुख्य भाग. येथे अनेक कॅफे आहेत आणि तेथे मनमुराद गप्पा मारता मारता विविध पदार्थ आणि कॉफीची मजा लुटता येते. हे शहर आता स्मार्टसिटी म्हणून विकसित करण्याचे काम सुरु झाले आहे.

Leave a Comment