जगात सर्वाधिक काळ चालणारा बस्तर येथील दशहरा मंगळवारी नेहमीच्या परंपरागत पद्धतीने सुरु झाला आहे. छत्तिसगढ मधील या आदिवासी बहुल भागात दशहरा उत्सव ७५ दिवस साजरा केला जातो आणि हि परंपरा गेली ६०८ वर्षे पाळली जाते. हा उत्सव पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. मंगळवारच्या कार्यक्रमाला हजारोंच्या संखेने लोक उपस्थित होते.
जगातील सर्वात दीर्घ, दशहरा पर्व बस्तर मध्ये सुरु
या भागाची आराध्य देवी आहे काछनदेवी. उत्सवाची सुरवात या देवीची गादीवर म्हणजे आसनावर स्थापना होण्यापासून होते. यंदा ९ वर्ष्याच्या मुलीला देवी म्हणून प्रथम गावातून मिरवणूक काढून मिरविले गेले आणि त्यानंतर तिला खास बनविलेल्या काट्याच्या झोपाळ्यावर बसवून झुलविले गेले. या मुलीला या अगोदर सात दिवस फक्त फलाहार दिला गेला आणि आता नवरात्राचे नऊ दिवस तिला उपवास करावा लागेल.
परंपरेनुसार येथील राजा त्याच्या परिवारासह राजमहालातून बाहेर पडतो आणि त्याने या देवीची युद्धासाठी परवानगी मागायची असते. मग देवी फुल देऊन राजाला परवानगी देते. या वेळी मोठी आतषबाजी केली जाते, मिरवणुका काढल्या जातात आणि या समारोह पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. त्यानंतर रैला पूजा केली जाते. फार पूर्वी एका राजकुमारीने आत्मग्लानी येईपर्यंत उपवास करून समाधी घेतली होती. तिच्या स्मरणार्थ तिची पूजा केली जाते, शोक्गीते गाईली जातात आणि चणे फुटणे प्रसाद म्हणून वाटले जातात.