उबेरच्या ग्राहक आणि ड्रायव्हरचे मोबाईल नंबर राहणार गोपनीय

uber
टॅक्सी सेवा पुरविणारी कंपनी उबेर ग्राहकांसाठी आता एक नवीन फीचर आणणार आहे. हे फिचर आल्यानंतर उबेरच्या ग्राहक आणि चालकांचे मोबाईल नंबर गोपनीय राहतील आणि एकमेकांना कळणार नाहीत. ग्राहक आणि चालक केवळ उबेर अॅपच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधू शकतील.

“आम्ही या तंत्रज्ञानासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहोत. याचा फायदा हा असेल, की तुम्ही जेव्हा चालकाला फोन कराल तेव्हा त्याला तुमचा नंबर दिसणार नाही. हे तंत्रज्ञान भारतात लवकरच सुरू होईल, ” असे उबेर इंडियाचे प्रेसिडेंट (दक्षिण एशिया) प्रदीप परमेश्वरन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले. चालक आणि ग्राहक या दोघांकडूनही अशा सोईची मागणी करण्यात येत होती, अशी माहितीही त्यांनी दिली.

उबेरचे हे तंत्रज्ञान ऑस्ट्रेलिया और दक्षिण आफ्रिकेसहित अनेक देशांमध्ये वापरण्यात येत आहे. उबेरला भारतात अनेक शहरांमध्ये आपल्या सेवा सुरू करायच्या आहेत, असे परमेश्वरन यांनी सांगितले. भारत हा जगातील सर्वात मोठी ‘पूल’ राईड बाजारपेठ म्हणून समोर आला आहे.

सध्या उबेर देशातील 30 शहरांमध्ये सेवा देत आहे, तर तिची स्पर्धक कंपनी ओला सुमारे 110 शहरांमध्ये सेवा पुरवत आहे. उबेर प्लॅटफॉर्मवर राईडची संख्या वाढत आहे, मात्र व्यापारासाठी आणखी बाजारपेठ बाकी आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment