इंद्रधनुच्या रंगांनी नटलेली ही नदी

river
आजवर अनेक सुंदर, वळणदार नद्या आपल्या पाहण्यात आल्या असतील. यांपैकी अनेक नद्यांशी निगडित रहस्ये, आख्यायिका देखील आपण ऐकल्या असतील, पण या जगामध्ये एक खास नदी अशीही आहे, जिच्यामध्ये वाहणाऱ्या पाण्याचे रंग ऋतुमानानुसार बदलत असतात. निसर्गाने निर्माण केलेला हा चमत्कारच म्हणायला हवा. ज्यांनी प्रत्यक्षात या नदीचे दर्शन घेतले आहे, त्यांच्या आश्चर्याला देखील पारावार उरला नाही.
river1
कॅनो क्रिस्टल्स नामक ही नदी कोलंबियामध्ये वाहते. या नदीची खासियत ही, की या नदीचे पाणी, दर ऋतूमध्ये निरनिराळ्या रंगांचे दिसते. या नदीचा प्रवाह शंभर किलोमीटरचे अंतर पार करीत असून, या नदीचे पात्र वीस मीटर रुंदीचे आहे. कॅनो क्रिस्टल्सचा रंग कधी पिवळाधमक असतो, तर कधी ही नदी एखाद्या पाचूसारखी हिरवीगार दिसते. इंद्रधनुचे रंग ल्यायलेल्या या नदीला ‘लिक्विड रेनबो’ या नावाने देखील ओळखले जाते.
river2
२००० सालापर्यंत या नदीच्या आसपासच्या प्रदेशामध्ये बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्या काही हिंसक संघटना कार्यरत असल्याने या नदीच्या परिसरामध्ये फिरावयास जाणे धोकादायक समजले जात असे. पण आता या नदीपासूनच काही अंतरावर कोलंबियन सैन्याने आपला मोठा तळ स्थापन केला असल्याने या प्रांताची जबाबदारी आता कोलंबियन सैन्याने स्वीकारली आहे. त्यामुळे हा प्रांत आता सुरक्षित बनला असून, आता या ठिकाणी ‘लिक्विड रेनबो’चे दर्शन घेण्यासाठी पर्यटक सर्वच ऋतुंमध्ये गर्दी करीत असतात. येथे येण्यासाठी परवानगीची आवश्यकता असून, एका दिवसामध्ये केवळ दोनशे पर्यटकांना येथे येण्याची परवानगी देण्यात येते.
river3
या नदीमध्ये ‘मॅकारेनिया क्वॅलीगेरा’ नामक वनस्पती मुबलक मात्रेमध्ये आहे. या वनस्पतीचा रंग बदलत्या ऋतुमानानुसार आणि सूर्यप्रकाशाच्या उपलब्धतेनुसार बदलत राहतो. म्हणूनच या वनस्पतीचा रंग जसा असेल, त्याच रंगाचे नदीचे पाणी दिसू लागते. या नदीचा रंग बहुतेक महिन्यांमध्ये हलका गुलाबी किंवा भडक लाल असतो. पण क्वचित या नदीमध्ये निळा, हिरवा आणि पिवळा रंगही पहावयास मिळतो. जून ते नोव्हेंबर महिन्यांमध्ये या नदीच्या पाण्यामध्ये रंगांची उधळण पहावयास मिळते. कॅनो क्रिस्टल्स नदी कोलंबियाच्या सरानिया-द-ला मॅकरोना या प्रांतामध्ये वाहत असून, ही नदी पुढे ग्वायाबरो नदीला जाऊन मिळते.

Leave a Comment