उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान करणार इन्फोसिस

infosys
बंगळुरु – आता सामाजिक उपक्रमांना बळकटी देण्याचे काम सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीची आणि नामांकित कंपनी इन्फोसिस करणार आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती, संस्था, अशासकीय संघटना (एनजीओ) आदींना या अंतर्गत विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याबाबतची घोषणा कंपनीने नुकतीच केली आहे.

याबाबतची माहिती देताना सुधा मुर्ती म्हणाल्या की, आमच्या समुहाने घोषणा केल्याप्रमाणे चालू वर्षी १.५ कोटीचे वाटप करण्यासाठी आम्ही वचनबध्द असून ह्या निधीचे वाटप सामाजिक क्षेत्रात पुनरउत्थानाचे काम करणा-या आणि समाजाभिमुख बदल घडविणाऱ्या संस्था, व्यक्ती यांना करण्यात येईल. अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सुधा मुर्ती या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मुर्ती यांच्या पत्नी आहेत.

या पुरस्काराचे नाव ‘आरोहन सामाजिक पुनरउत्थान पुरस्कार’ असे आहे. आरोग्य, अनाथआश्रम, ग्रामीण विकास, महिला सुरक्षा आणि सक्षमीकरण, शिक्षण, क्रिडा आणि शाश्वत विकास या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

विविध समस्यांनी आज देशातील जनता त्रासली आहे. अशावेळी आपली ही जबाबदारी आहे की, आपण सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना आधार दिला पाहिजे. पहिल्या टप्प्यातील या पुरस्कारासाठीचे नामांकन १५ ऑक्टोबरला सुरु होत असून, नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ डिंसेबर आहे. १८ वर्षांवरील भारतात राहणाऱ्या व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र असतील. पाच जणांची निवड समिती विजेत्याची घोषणा करेल. अशी माहितीही समुहाकडून देण्यात आली.

Leave a Comment