जुने लॉटरीचे तिकीट अचानक खिशामध्ये सापडल्याने मिळाली मालामाल होण्याची संधी - Majha Paper

जुने लॉटरीचे तिकीट अचानक खिशामध्ये सापडल्याने मिळाली मालामाल होण्याची संधी

lotto
ग्रेगोरियो डे सँटीस या मॉन्ट्रेआल मधील रहिवाश्याने मागील वर्षीच्या डिसेंबर महिन्यामध्ये एक लॉटरीचे तिकीट खरेदी केले. जितक्या सहजपणाने हे लॉटरीचे तिकीट ग्रेगोरियोने खरेदी केले, तितक्याच सहजपणे हे तिकीट आपल्या कोटाच्या खिश्यामध्ये ठेऊन तो त्याबद्दल विसरूनही गेला. आपल्याला लॉटरी लागेल याची कल्पना ग्रेगोरियोने कधीच केली नसल्याने, ज्या दिवशी या लॉटरीचा ‘ड्रॉ’ निघाला, म्हणजेच जेव्हा लॉटरी लागलेल्या तिकिटांचे नंबर घोषित करण्यात आले, तेव्हा ग्रेगोरियोने हे निकाल पहिलेच नाहीत. मुळातच, आपल्याकडे एक लॉटरीचे तिकीट आहे, याचाच मुळी त्याला विसर पडला होता. या लॉटरीमध्ये ५.४ मिलियन डॉलर्सच्या चार बक्षिसांची घोषणा करण्यात आली. यातील तीन बक्षिसे विजयी लॉटरीधारकांना दिली गेली, पण १.३५ मिलियन डॉलर्सचे बक्षीस मात्र दिले गेले नव्हते. हे बक्षीस ग्रेगोरीयोच्या तिकिटावर लागलेले होते !

काही महिन्यांनी ग्रेगोरीयोच्या बहिणीने घर आवरायला काढले असताना, ग्रेगोरियोला नको असलेले जुने कपडे, गरजूंना देण्यासाठी बाजूला काढण्यास तिने ग्रेगोरियोला सांगितले. ग्रेगोरियोने इतर कपड्यांच्या सोबत आपला जुना कोटही बाहेर काढला. कोटाचे खिसे तपासण्यासाठी सहज ग्रेगोरीयोने खिश्यामध्ये हात घातल्यावर त्याच्या हाताला, काही महिन्यांपूर्वी खरेदी केलेले लॉटरीचे तिकीट लागले. या तिकिटाचा निकाल काय लागला असावा याची उत्सुकता वाटून ग्रेगोरियोने ‘लोटो-क्युबेक’च्या कार्यालयामध्ये जाऊन चौकशी केली असता, या तिकिटावर तब्बल १.३५ मिलियन डॉलर्सची रक्कम जिंकल्याचे कळल्यावर ग्रेगोरियोला आश्चर्याचा धक्का बसला.

ग्रेगोरियोचे नशीब चांगलेच फळफळले होते. त्याच्या सुदौवाने बक्षिसाची रक्कम, तिकिटाचा ड्रॉ जाहीर झाल्यापासून वर्षभराच्या अवधीमध्ये कधीही घेता येत असल्याने, या तिकिटावर जिंकलेली रक्कम ग्रेगोरियो याला मिळाली. या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला, म्हणजेच लॉटरी लागल्यापासून तब्बल आठ महिन्यांच्या नंतर ग्रेगोरियोला या बक्षिसाची रक्कम, त्याला मिळाली असल्याचे समजले. इतकी मोठी रक्कम मिळाल्याने ग्रेगोरियो अर्थातच आनंदात आहे. या रकमेचा वापर तो आपल्या भविष्यकाळासाठी करणार आहे.

Leave a Comment