भूतांना भेटायचे असेल तर या हॉटेलात टाका मुक्काम

palace
अमानवी अश्या म्हणजे रहस्यमय, भुतेखेते, प्रेतात्मे असल्या गोष्टींचे आकर्षण अनेकांना असते. भुते खरच असतात का, झपाटलेल्या जागा म्हणजे नक्की काय हे प्रश्न वादाचे असू शकतील पण या विषयावर अनेक किस्से ऐकविले जातात. काही लोकांचा त्यावर विश्वास बसतो तर काही जणांना हे सारे थोतांड वाटते. तुम्हाला खरोखर असले काही अनुभव घ्यायचे असतील तर भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत. देशातील काही नामवंत हॉटेल्स मध्येही असे अनुभव आल्याचे सांगितले जाते. तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर या हॉटेलात मुक्काम टाका.

मुंबईची शान मानले जाणारे हॉटेल ताज पॅलेस त्याची अति सुंदर इमारत आणि २६/११ या दिवशी या हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ला यामुळे जगभरात प्रसिद्ध झाले आहे. याच हॉटेलात एक भूत वावरत असते असे येथील स्टाफ आणि काही ग्राहक सांगतात. या हॉटेलचे डिझाईन फ्रेंच वास्तूरचनाकार चेम्बर्स याने केले होते. तो इंग्लंडहून परत आला तेव्हा त्याच्या आराखड्याप्रमाणे हॉटेल बांधले गेलेले नाही असे दिसल्यावर तो भयंकर निराश झाला आणि त्याने या हॉटेलच्या ५ व्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला. त्याचेच भूत हॉटेलमध्ये वावरताना दिसते असे म्हणतात.

fernhill
हिलस्टेशन उटी येथील १८४४ साली बांधले गेलेले हॉटेल फर्नहिल येथेही असा अनुभव आला आहे. बॉलीवूड मधील नृत्यदिग्दर्शिका सरोज खान त्यांच्या टीमसह राज या चित्रपटाच्या वेळी येथे राहिल्या तेव्हा अपरात्री वरच्या मजल्यावरून फर्निचर सरकविल्याचे आवाज जोरात येऊ लागले. सकाळी त्यांनी हॉटेल व्यवस्थापनाकडे त्यासंदर्भात तक्रार केली तेव्हा हॉटेलला वरचा मजलाच नाही असे त्यांना दिसून आले.

sevoy
मसुरी येथील हॉटेल सेव्हॉय येथेही एका महिलेचे भूत दिसते असे सांगतात. १९०२ साली हे हॉटेल बांधले गेले आणि १९१० साली तेथे लेडी गार्नेट नावाची गेस्ट महिला तिच्या खोलीत मृतावस्थेत आढळली. तिला औषधातून विष दिले गेले होते असे उघडकीस आले. या महिलेचे भूत या हॉटेलच्या कॉरीडॉर मध्ये फिरते असे म्हणतात. विशेष म्हणजे या महिलीची देखभाल करत असलेला डॉक्टर तिच्या मृत्यूनंतर थोड्याच वर्षात त्याच पद्धतीने मरण पावला होता.

Leave a Comment