खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या मंत्र्यांना तुडवून काढा – राजू शेट्टी

raju-shetty
मुंबई – वादग्रस्त वक्तव्य करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी खळबळ उडवून दिली आहे. अकोल्यातील निंबा गावात त्यांनी खोटी आश्वासने देऊन दिशाभूल करणाऱ्या मंत्र्यांचे कपडे फाडून तुडवून तुडवून काढा असे वक्तव्य केले होते. आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

अकोल्यातील निंबा गावात मागील आठवड्यात आयोजित एका सभेत राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांसमोर हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. मंत्री गावात येऊन शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देतात. ती पूर्ण न करता एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात. ऊठसूठ गावात येऊन भाषण करुन खोटी आश्वासने देणाऱ्या मंत्र्यांना ठोकून काढा. त्यांची कपडे फाडून तुडवून तुडवून मारा, हे माझे स्पष्ट मत असल्याचे त्यांनी सांगितले. आता या मंत्र्यांना तुडवले पाहिजे. मी त्यासाठी कोल्हापूरमधून माणसे पाठवेन याची वाट पाहू नका. त्यांना तुम्हालाच मारायचे असल्याचे शेट्टी म्हणाले होते.

सरकार आपले देणे लागते. बँकेचे देणे आम्ही देऊ शकत नाही. मग आम्ही मंत्र्यांना ठोकले तर बिघडले कुठे? असा सवाल त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना बँक अधिकारी कर्ज देत नाही. उलट शेतकरी माता भगिनींकडे शरीरसुखाची मागणी करतात. अशा उद्दाम अधिकाऱ्यांवर कारवाई होत नसल्यामुळे मंत्र्यांना ठोकलेच पाहिजे. या वक्तव्याचा कधीही पश्चाताप होणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

शेट्टी यांच्या पाठोपाठ त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यापुढे एकाही शेतकऱ्याने आत्महत्या करायची गरज नाही. गरज पडल्यास कापूस-सोयाबीनला भाव न देणाऱ्या मंत्र्यांना पेटवा, खासदार-आमदारांना ठोका, पण आत्महत्या करू नका असे वक्तव्य तुपकर यांनी केले. तसेच शेट्टींनी सांगितले तर एखाद्या मंत्र्याला भोसकायलाही कमी करणार नसल्याचे वक्तव्य तुपकर यांनी करुन खळबळ उडवून दिली आहे.

Leave a Comment