पोहण्यासाठी तलावामध्ये उतरलेल्या मुलीला सापडली पंधराशे वर्षे जुनी तलवार.

sword
स्वीडनमधील व्हीडोस्टर्न या तलावामध्ये पोहोण्यास उतरलेल्या सागा वानेक या आठ वर्षीय मुलीला पंधराशे वर्षे पूर्वीची, ‘व्हायकिंग’ कालीन तलवार सापडली आहे. बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार लहानगी सागा, या तलावामध्ये पोहोण्यासाठी उतरली असता, ही तलवार तिला पाण्यामध्ये सापडली. त्यानंतर सागाच्या पालकांनी स्थानिक वस्तूसंग्रहालयाच्या क्युरेटरना या संदर्भात माहिती दिल्यानंतर त्यांनी ही प्राचीन तलवार ताब्यात घेतली. आता ही तलवार येथील स्थानिक जोनकोपिंग वस्तूसंग्रहालयामध्ये ठेवली गेली असून, ही तलवार पंधराशे वर्षांपूर्वीची असल्याचे वस्तूसंग्रहालयाच्या क्युरेटरनी सांगितले.
sword1
या संदर्भात वस्तूसंग्रहालयाच्या वतीने एक परिपत्रक काढण्यात आले असून त्यामध्ये या तलवारीची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सागाला ही तलवार सापडल्यानंतर तिच्या पालकांनी जोनकोपिंग वस्तूसंग्रहालयातील पुरातत्वतज्ञ अॅनी रोजेन यांना सूचित केले असता, अॅनीने त्वरेने त्यांना प्रतिसाद देत व्हीडोस्टर्न येथे पोहोचून ही तलवार आपल्या ताब्यात घेतल्याचे समजते. ही तलवार सागाला काही दिवस आधी सापडली असली, तरी त्यासंदर्भातील वृत्त अलीकडच्या काळात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
sword2
या संदर्भात एका स्थानिक वृत्तपत्राला आपला अनुभव सागाने कथन केला आहे. ती पोहत असताना तिला ही तलवार सापडली, तेव्हा सुरुवातीला आपल्या हाती नक्की काय लागले आहे हे तिच्या लक्षात आले नाही. पाण्यामध्ये पडलेली अशीच एखादी गंजलेली वस्तू समजून सागा, ही तलवार पुन्हा पाण्यामध्ये फेकणार तोच या वस्तूला मूठ असून, ती टोकदार असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे आपल्या हातातील वस्तू एक तलवार आहे हे लक्षात येताच सागाने त्वरेने आपल्या वडिलांना याची सूचना दिली. सागाच्या वडिलांनी सागाला सापडलेली वस्तू एक पुरातनकालीन तलवार आहे याची खात्री होताच, त्वरेने स्थानिक वस्तूसंग्रहालायातील पुरातत्ववेत्त्यांना तशी सूचना देऊन, ती तलवार त्यांच्या ताब्यात दिली. या तलवारीप्रमाणे इतर काही प्राचीन वस्तू तलावामध्ये किंवा त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सापडतात का हे पाहण्यासाठी सध्या पुरातत्ववेत्ते या भागामध्ये शोध घेत आहेत.