चला यंदाच्या ‘रण उत्सवा’साठी

rann
कच्छ, गुजरात येथे दर वर्ष साजरा होणाऱ्या रण उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी दर वर्षी हजारो देशी विदेशी पर्यटक येथे हजेरी लावीत असतात. कच्छचे रण (Rann of Kutch) हे तीस हजार स्क्वेअर किलोमीटरच्या विशाल परिसरामध्ये पसरलेले वाळवंट आहे. कच्छ भागामध्ये असलेल्या या वाळवंटाचा विस्तार कच्छच्या ‘gulf’ पासून दक्षिणी पाकिस्तान मधील इंडस नदीच्या उगमापर्यंत आहे. थंडीच्या दिवसात पांढरे शुभ्र होऊन रात्रीच्या चांदण्यामध्ये चमकणारे हे रण उन्हाळ्याच्या दिवसांत मात्र दमट, ओलसर भूभागामध्ये परिवर्तीत होते. असे हे कच्छचे रण जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.
rann1
२००५ साली गुजरात पर्यटन मंत्रालयाच्या वतीने रण उत्सव आयोजनाला सुरुवात करण्यात आली. देशी-विदेशी पर्यटकांना या विशाल रणाकडे आकर्षित करण्याच्या आणि पर्यायाने पर्यटन वाढावे या हेतूने या उत्सवाचे आयोजन केले जाऊ लागले. या उत्सवाद्वारे स्थानिक शाकाहारी खाद्यपरंपरा आणि संस्कृतीची ख्याती सर्वत्र व्हावी याही हेतूने या उत्सवाचे आयोजन केले गेले. २००५ साली सुरु झालेला हा रण उत्सव तीन दिवसांचा असे. पण पाहता पाहता या उत्सवाची ख्याती आणि लोकप्रियता इतकी वाढली, की सुरुवातीच्या काळामध्ये तीन दिवसांचा असलेला हा उत्सव आता तब्बल चार महिने सुरु असतो.
rann2
हा उत्सव नोव्हेंबर महिन्यात सुरु होऊन फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरु असतो. दर वर्षी या उत्सवाकरिता येणाऱ्या पाहुणे मंडळींची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी येथे तंबू उभारण्यात येतात. हे तंबू अतिशय आरामदायक असून सर्व सोयींनी परिपूर्ण असतात. परदेशी पर्यटकांसाठी देखील सर्व प्रकारच्या सोयी या तंबूंमध्ये उपलब्ध करून देण्यात येतात. येथे येणाऱ्या पाहुण्यांना कच्छच्या रणाचा फेरफटका, पारंपारिक वस्तूंची प्रदर्शने, पारंपारिक नृत्यकला, आणि अर्थातच पारंपारिक चविष्ट भोजन यांचा मनसोक्त आनंद घेता येतो. कच्छच्या रणाचा फेरफटका घेण्याचा आनंद पौर्णिमेच्या रात्री विशेष असतो. कच्छच्या रणाबरोबरच गांधी नु गाम, कालो डुंगर, भुज, भूजौडी, ही येथील अन्य प्रेक्षणीय स्थळे आहेत.
rann3
कच्छला सर्वात जवळचे शहर भुज आहे. मुंबईहून भुजला जाण्यासाठी विमानसेवा उपलब्ध आहे. तसेच अहमदाबाद पासून भुजला जाण्यासाठी ट्रेन सेवाही उपलब्ध आहे. अहमदाबाद पासून भुजला जाण्यासाठी बसेसही उपलब्ध आहेत. त्यानंतर कच्छला पोहोचण्यासाठी खासगी वाहन व्यवस्था भुजमध्ये उपलब्ध आहे.