मेघन मार्कलला घ्यावे लागणार शाही परिवाराच्या सदस्याला साजेलशा वर्तनासाठी मार्गदर्शन

meghan-markel
ब्रिटीश शाही घराणे आजच्या काळामध्येही ते पालन करीत असलेल्या काही विशिष्ट रीती-रिवाज आणि परंपरांच्यामुळे ओळखले जाते. हे रीतीरिवाज आणि परंपरा गेली अनेक शतके ब्रिटीश शाही घराण्यामध्ये अगत्याने पाळल्या जात आहेत. शाही घराण्याचे सर्वच सदस्य अतिशय लोकप्रिय असून, हे सर्व सदस्य अनेक सार्वजनिक, समाजकल्याणकारी, तसेच अनेक औपचारिक कार्यक्रमांमध्ये नेहमी सहभागी होत असतात. यामध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांबरोबरच परदेशी राजनेते आणि इतर पाहुणे ही सहभागी होत असतात. अश्यावेळी शाही परिवारातील सदस्यांकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले असते. त्यामुळे त्यांचे वर्तन शाही घरण्याच्या प्रतिष्ठेला साजेसे असावे या दृष्टीने शाही परिवारातील सदस्य अनेक अलिखित नियमांचे काटेकोर पालन करीत असतात. या नियमांना स्वतः राणी एलिझाबेथ देखील अपवाद नसून, हे नियम पाळले जाण्याबद्दल ती आग्रही असते.
meghan-markel1
ब्रिटीश शाही घराण्याचा राजकुमार प्रिन्स हॅरी नुकताच, व्यवसायाने अभिनेत्री असलेल्या मेघन मार्कलशी विवाहबद्ध झाला. मेघन अमेरिकन असून, शाही घराण्याच्या रीतीरीवाजांच्या बद्दल तिला माहिती होत असली, तरी या परंपरा आणि रिवाज अंगवळणी पडण्यास तिला काही अवधीची आवश्यकता आहे. हे ओळखून राणी एलिझाबेथ हिने तिची खास मदतनीस समंथा कोहेन हिच्यावर, मेघनला शाही घराण्याची सदस्य म्हणून तिचे वर्तन कसे असले पाहिजे, यासंबंधी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविली आहे.
meghan-markel2
या पूर्वी अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मेघनचे वर्तन, तिने परिधान केलेले पोशाख, चर्चेचा विषय ठरले आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये आपल्या वर्तनामुळे लोकांना चर्चेला विषय मिळावा हे राणीला नापसंत असल्यामुळे किमान सहा महिने मेघनने योग्य मार्गदर्शन घेऊन शाही घराण्याच्या नियमांची ओळख करून घ्यावी अशी राणीची इच्छा असल्याने, आता मेघन पुढील सहा महिने सर्व सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये समंथा कोहेन हिच्या मार्गदर्शनाखाली सहभागी होणार आहे.

Leave a Comment