जखमी कासवाला चालता यावे या करिता खास व्हीलचेअर

wheel
मेरीलंड येथील प्राणीसंग्रहालयातील हे कासव गंभीर जखमी झाले असले, तरी तेथील कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला चालता येणे शक्य झाले आहे. याचे कारण म्हणजे या कासावासाठी ‘लेगोज’चा वापर अक्रून खास तयार करण्यात आलेली व्हीलचेअर. या व्हीलचेअरच्या मदतीने हे कासव आता धीम्या गतीने का होईना, पण चालू शकत आहे. इस्टर्न बॉक्स प्रजातीचे हे कासव मेरीलंड प्राणीसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्याला जखमी अवस्थेमध्ये सापडले. या कासवाच्या पायांना इजा झाली असून त्याच्या पाठीवरील कवचही फ्रॅक्चर झाले होते. त्यामुळे त्याला चालता येणे शक्य नव्हते. पण त्यावर कर्मचाऱ्यांनी युक्ती करून लहान मुले खेळतात त्या लेगो वापरून या कासवासाठी व्हीलचेअर तयार केली असल्याने आता हे कासव पुन्हा हिंडू-फिरू लागले आहे.
wheel1
पायांच्या सोबत या कासवाच्या पाठीवरील टणक कवचही फ्रॅक्चर झाले आहे. या कवचाला झालेले फ्रॅक्चर भरून यावे याकरिता हे कवच सरळ राहणे आवश्यक होते. या कासावासाठी तयार करण्यात आलेल्या व्हीलचेअरमुळे कवचाला आधार मिळत असून, हे कवच सरळ, संतुलित ठेवण्याला मदत मिळत आहे. त्यामुळे त्यावरील फ्रॅक्चर बरे होण्यास मदत मिळणार असल्याचे व्हेटर्नरी डॉक्टरांनी सांगितले. सुरुवातीला या कासवाची शस्त्रक्रिया करण्यात येऊन त्यानंतर दोन आठवड्यांनी त्याच्यासाठी खास तयार करण्यात आलेली ही व्हीलचेअर त्याला देण्यात आली. कासवांची चयापचय शक्ती अतिशय मंद असल्याने ही जखम भरून येण्यास काही अवधी लागणार आहे.
wheel2
या व्हीलचेअरमुळे कासवाला कोणत्याही प्रकारची अडचण होत नसून, व्हीलचेअर दिली गेल्यानंतर थोड्याच अवधीमध्ये हे कासव हिंडू फिरू लागल्याचे प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी म्हणतात. कासवाच्या पाठीवरील टणक कवचाला देखील या व्हीलचेअरमुळे आधार मिळाला असून, त्यामुळेच कासवाला चालता येणे शक्य झाले आहे. मेरीलंड प्राणीसंग्रहालयाच्या वतीने या कासवाची छायाचित्रे सोशल मिडियाद्वारे शेअर केली गेली असून, ही छायाचित्रे खूपच लोकप्रिय होत आहेत. तसेच प्राणीसंग्रहालयातील डॉक्टरांनी या कासावासाठी वापरलेल्या युक्तीचे कौतुकही सर्वत्र होत आहे.