ग्रीसमधील या लहानशा गावाकडे जर कोणी वाट चुकलेच तर त्याला आपण एखाद्या भयकथेमध्ये आल्याचा भास होईल. ऐतोलीको नामक ग्रीसमधील हे गाव एरव्ही ग्रीसचे ‘व्हेनिस’ म्हणून ओळखले जात असले, तरी सध्या या गावामध्ये हजारो कोळ्यांचा प्रादुर्भाव असून, या गावामध्ये येणाऱ्या प्रत्येकाचा इथले दृश्य पाहून अचंबा वाटल्यावाचून राहत नाही. येथे आलेल्या एका पर्यटकाने घेतलेल्या छायाचित्रांच्यावरुन या गावामध्ये येणाऱ्याला कश्या प्रकारचे दृश्य नजरेस पडते याचा अंदाज येऊ शकतो.
या गावातील झाडे, पाने, फुले, रोपे, सर्व काही कोळ्यांच्या दाट जाळ्यांच्या खाली गडप झाले आहे. इतकेच नाही तर पाहावे त्या ठिकाणी लहान मोठ्या आकारांचे कोळी दृष्टीस पडतात. प्रामुख्याने दृष्टीस पडणारे कोळी ‘टेट्राग्नाथा’ किंवा ‘ग्नॅट’ जातीचे असून, हे कोळी आकाराने इतके लहान आणि वजनाला इतके हलके असतात, की पाण्यावर पळणे देखील यांना सहज शक्य असते. या कोळ्यांचा मोठ्या प्रमाणाट प्रादुर्भाव झाला असून, या कोळ्यांनी विणलेली जाळी सर्वत्र दिसत आहेत. पण तरीही या कोळ्यांपासून मनुष्यासाठी कोणताही धोका नसल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार कोळ्यांचा अश्या प्रकारचा प्रादुर्भाव फार दुर्मिळ असला, तरी अजिबात अशक्य नव्हे. ऐतोलीको गाव कोळ्यांच्या जाळ्यांनी झाकले जाण्याचे कारण म्हणजे येथे प्रामुख्याने ‘ग्नॅट’ या प्रजातीचे कोळी सर्वाधिक असणे, हे आहे. मात्र थंडीमध्ये या प्रजातीचे कोळी जगू शकत नसून एकदा का येथे थंडी पडायला सुरुवात होऊन तापमान झपाट्याने उतरू लागले, की या कोळ्यांचा प्रादुर्भावही कमी होऊ लागत असल्याचे तज्ञ म्हणतात.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सगळीकडे कोळ्यांची पसरलेली मोठी मोठी जाळी पाहून या गावामध्ये आलेल्या पाहुणे मंडळींना धक्का बसत असला, तरी स्थानिक लोकांना आता हे अंगवळणी पडलेले आहे. येथे आलेल्या पर्यटकांनी या गावाची छायाचित्रे सोशल मिडियावर शेअर केली असता, नेटीझन्सकडूनही निरनिराळ्या प्रतिक्रिया पहावयास मिळत आहेत.