भारतातील निवडणुकीसाठी फेसबुक बनविणार तंत्रज्ञांची फौज!

facebook
भारतात पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियातून काही गडबड होऊ नये, यासाठी फेसबुक कंपनी तंत्रज्ञांची फौज तयार करणार आहे! चुकीच्या लोकांनी या व्यासपीठाचा गैरवापर करण्यापासून रोखण्यासाठी शेकडो लोकांचा समावेश असलेल्या कृती दलाची (टास्क फोर्स) स्थापना केली आहे, असे कंपनीच्या वतीने शनिवारी जाहीर करण्यात आले.

वर्ष 2019 ची निवडणूक येत असताना राजकीय पक्षांसोबत मिळून कार्य करण्यासाठी आम्ही तज्ज्ञांचा समूह एकत्र आणत आहोत, असे युरोप, पश्चिम आशिया आणि आफ्रिकेसाठीच्या धोरणासाठीचे उपाध्यक्ष रिचर्ड अॅलन यांनी पत्रकारांना सांगितले.

“या टीममध्ये सुरक्षा तज्ञ आणि आशय तज्ञ असतील. ते भारतातील निवडणुकीशी संबंधित गैरवर्तनाच्या
सर्व शक्यता समजून घेण्याचा प्रयत्न करतील,” असे अॅलन म्हणाले. फेसबुकची समुदाय मानके या विषयावर कंपनीच्या वतीने दिल्लीत आयोजित कार्यशाळेदरम्यान ते बोलत होते.

“वास्तविक राजकीय बातम्या आणि राजकीय प्रचार यांच्यात फरक करणे हे भारतातील टास्क फोर्ससमोरचे आव्हान असेल. हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म भारतासह जगभरातील देशांना मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका करण्यासाठी मदत करू इच्छित आहे,” असे अॅलन म्हणाले

अमेरिकेत 2016 च्या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाशी संबंधित खात्यांवरून चुकीची माहिती पसरविण्यासाठी या सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मचा वापर झाल्याच्या आरोपांनंतर फेसबुकवर विविध सरकारांची नजर वळली आहे. तेव्हापासून जाहिरात धोरणासोबतच आपल्या व्यवसायाच्या वर्तनात अधिक पारदर्शकता आणून आपल्या प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्याचे प्रयत्न फेसबुकने केले आहेत.

Leave a Comment